सांगवी ते किवळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका रक्षक चौकात उभारणार भुयारी मार्ग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० सप्टेंबर ।। सांगवी-किवळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे २६.४० मीटर रुंदीच्या भुयारी मार्गाची बांधणी करण्यात येणार आहे.या प्रस्तावित भुयारी मार्गामुळे प्रवाशांना रहदारीसाठी सुलभता निर्माण होणार असून, यामुळे इंधन व वेळेचीही बचत होणार आहे.

सांगवी ते किवळे या रस्त्यावर ४५ व ३० मीटर रुंदीचा बीआरटी मार्ग विकसित करण्यात आला आहे. तसेच हा रस्ता पिंपरी चिंचवड व पुणे या दोन्ही महापालिकांना जोडणारा तसेच मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर वाकड, हिंजवडी, पुनावळे, रावेत, किवळे, ताथवडे या भागात होत असलेल्या विकासामुळे तसेच वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाढत्या रहदारीमुळे येथील वाहनांच्या रांगा लागून चौकामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा बीआरटी बससेवा, शालेय विद्यार्थी बसेस, रोज ये-जा करणारे चाकरमानी तसेच मालवाहतूक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी रक्षक चौक येथे महापालिकेच्या वतीने भुयारी मार्गाची बांधणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पास नुकत्याच झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

रक्षक चौकातील प्रस्तावित भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून पिंपरी चिंचवड व पुणे या दोन्ही मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. तसेच यामुळे डांगे चौकाकडून पिंपळे निलखकडे आणि पुण्याकडून औंध मिलीटरी स्टेशनकडे जाणारी वाहतूक विना सिग्नल होणार असून वेळेची तसेच इंधनाची देखील बचत होणार आहे.

-प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

सांगवी ते किवळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने, रक्षक चौकामध्ये वाहतूककोंडीचा भार वाढत आहे. वाढणाऱ्या कोंडीवर धोरणात्मक उपाय म्हणून भुयारी मार्ग विकसित करण्यात येणार आहे. भुयारी मार्गाची उभारणी केल्यानंतर या मार्गावरील वाहतूककोंडी कमी करून मार्गावरून प्रवास करणाऱ्या रहिवाशांसाठी सुव्यवस्था निर्माण होणार आहे आणि वाहतुकीस लागणारा कालावधी तसेच इंधनाच्या बचतीमुळे संभाव्य पर्यावरणाची हानी टाळता येणार आहे.

-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

 

· प्रस्तावित भुयारी मार्गाची थोडक्यात माहिती –

· भुयारी मार्गाची रुंदी – २६.४० मीटर (१८X५.५० मीटर)

· कामाची मुदत – १८ महिने

· निविदा रक्कम – २२ कोटी ७७ लाख

· निविदा स्विकृती रक्कम -१८ कोटी ६५ लाख

· भुयारी मार्गासाठी औंध बाजूस १२५ मीटर व जगताप डेअरीच्या बाजूस २४० मीटर लांबीचा रॅम्प विकसित करणार

बॉक्स

भुयारी मार्गामुळे होणारे फायदे –

· सांगवी ते किवळे रस्त्यावरील रहदारी कमी होण्यास मिळणार मदत

· रक्षक चौकातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांच्या इंधनाची तसेच वेळेची बचत

· बीआरटी बससेवा, शालेय विद्यार्थी बसेस, रोज ये-जा करणारे चाकरमानी तसेच मालवाहतूक प्रवाशांना होणार फायदा

· इंधनाच्या बचतीमुळे संभाव्य पर्यावरणाची हानी टळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *