महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ सप्टेंबर ।। ऑगस्टचा संपूर्ण महिना आणि सप्टेंबरच्या तीन आठवड्यांपर्यंत राज्यात पावसाचा जोर फारसा नव्हता. मात्र आता सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवासही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवरात्रोत्सवावरही पावसाचे सावट असू शकेल. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी वर्तवलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार पावसाची सक्रियता वाढणार आहे.
राज्यामध्ये कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सप्टेंबर महिन्यात फारसा पाऊस पडलेला नाही. विदर्भाच्या काही भागांमध्ये अतिरिक्त पाऊस पडला आहे. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबरच्या निम्म्या महिन्याहून अधिक काळ पावसाने आखडता हात घेऊनही राज्यात २३ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. मात्र मुंबईसह सांगली, सातारा, पुणे, अहिल्यादेवी नगर, नाशिक, धुळे, धाराशीव, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट नोंदली गेली आहे. सोलापूर जिल्ह्यात ही तूट अधिक तीव्र आहे.
भारतीय हवामान विभागाच्या पुढील चार आठवड्यांच्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार २६ सप्टेंबरपासून पुढील १० ते १२ दिवस मध्य भारताच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत दक्षिण कोकण किनाऱ्यावर पावसाचा जोर अधिक असेल. उत्तर कोकणाच्या काही भागातही याचा परिणाम होईल. या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस असेल, असा अंदाज आहे. तसेच ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीतही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात १७ ऑक्टोबरच्या आठवड्यापर्यंत पाऊस कायम असेल. १० ते १७ ऑक्टोबरदरम्यान विदर्भाच्या बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी होईल. मात्र सध्याच्या अंदाजानुसार नवरात्रीदरम्यान पावसाची उपस्थिती असू शकेल.