Edible Oil: सणासुदीत महागाईची चाहूल ; रिफाइंड आणि मोहरी तेलाचे भाव कडाडले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ सप्टेंबर ।। सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या उत्साहाला उधाण येते. याच काळात अनेकांना बोनस मिळतो त्यामुळे बाजारात खरेदीला उधाण येते पण आता सणासुदीच्या तोंडावर सामान्यांचा खिसा आणखी कापला जाणार आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर आता लोकांना नवरात्र, दसरा आणि दिवाळीचे वेध लागले असताना महागाईनेही थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. सणासुदीत गोड आणि फराळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवले जातात तर या काळात तेल कंपन्यांकडून खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

सणासुदीत महागाईचे थैमान
कमी आयात शुल्क असतानाही खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींबाबत केंद्र सरकारने संबंधित कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. सरकारने तेल कंपन्यांना आयात केलेल्या खाद्यतेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असताना किंमत स्थिरता सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला असूनही दरांचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. अलीकडेच केंद्र सरकारने १४ सप्टेंबर रोजी देशांतर्गत तेलबियांच्या किंमतींना आधार देण्यासाठी विविध खाद्यतेलांवरील सीमा शुल्कात वाढ केली होती आणि त्यांनतर १७ सप्टेंबर रोजी किरकोळ किंमतींमध्ये कोणतीही वाढ होऊ नये याची खात्री करण्यासाठी अन्न मंत्रालयाने खाद्यतेल उद्योग संस्थांसोबत बैठक बोलावली होती.

सरकारचे तेल कंपन्यांना निर्देश
‘आगामी सणासुदीच्या काळात किरकोळ किंमतीत नरमाई ठेवण्याच्या सरकारी सूचना असूनही आयात शुल्क वाढवण्याच्या घोषणेनंतर किमतीत वाढ का होत आहे? याचे स्पष्टीकरण आणि कारणे देण्यास संबंधित कंपन्यांना सांगण्यात आले आहे,’ अन्न मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. कमी शुल्कात आयात केलेला साठा ४५ ते ५० दिवस सहज टिकू शकतो त्यामुळे, कंपन्यांनी कमाल किरकोळ किमती वाढवणे टाळावे असे मंत्रालयाने म्हटले. तसेच, सणासुदीचा काळ जवळ असून मागणी वाढेल अशा वेळी दरात वाढ करण्यात आली आहे.

खाद्यतेलाची किंमती महागल्या
केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याने अलीकडेच देशातील जीवनावश्यक वस्तूंची वाढलेली आकडेवारी जाहीर केली. यानुसार शेंगदाण्याचे तेल चार दिवसांत १८० वरून १८६ रुपये प्रति लिटर झाले तर मोहरीचे तेल १४२ वरून १४८ रुपये प्रति लिटर, वनस्पती तेल १२२ वरून १२६ रुपये प्रति लिटर महागले आहे. सर्व दर सरकारी असून वरील किरकोळ बाजारात यापेक्षाही अधिक किमती असू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *