महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। पुणे-बंगळुरू महामार्गावरील पश्चिम बाह्यवळण मार्ग वाहतुक कोंडीमुक्त करण्यासाठी विविध कामांना केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी हिरवा कंदील दर्शवला असून, तातडीने ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.
पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम बाह्यवळण मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव व उपाययोजना सादर करण्याच्या सूचना पुणे वाहतूक पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलिस आयुक्त अमितेशकुमार व अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अंशुमाळी श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, महापालिकेचे वाहतूक नियोजनकार निखिल मिजार, आर्किटेक्ट मिलिंद रोडे आदी सहकाऱ्यांसमवेत आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार केला आहे.
पुणे शहर हे लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील नवव्या क्रमांकाचे शहर आहे. पुणे महापालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश झाल्यानंतर पुण्याचे क्षेत्रफळ ५१९ चौरस किलोमीटर झाले. भौगोलिकदृष्ट्या पुणे देशातील सर्वांत मोठी महानालिका आहे. पुण्यात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. यातूनच निर्माण झालेली पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कोंडीची समस्या लक्षातघेऊन त्यासाठीची उपाययोजना करण्यात येत आहे.