महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या १९० इलेक्ट्रिक बसगाड्या असून ५०० बस ‘सीएनजी’वर चालतात. डिझेलवर चालणाऱ्या बसगाड्यांच्या तुलनेत सीएनजी व इलेक्ट्रिक बसचा खर्च प्रतिकिमी ५ ते ७ रुपये कमी आहे. मार्च २०२६ पर्यंत महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षीपासून लालपरीचा प्रवास स्वस्त होईल, अशी माहिती महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
प्रदूषणमुक्तीसाठी पर्यावरणपूरक वाहनांना पसंती दिली जात असून अनेक कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक व सीएनजीवरील वाहनांची निर्मिती सुरू केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून सबसिडी देखील दिली जात आहे. तरीदेखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अद्याप १२ हजारांहून अधिक बसगाड्या डिझेलवरच चालतात. त्या गाड्यांच्या इंधनावर दरमहा महामंडळाला सरासरी ४२० कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचा तिकीट दर कमी करता येत नसल्याची स्थिती आहे. पण, महामंडळाने आता पाच हजार इलेक्ट्रिक बस खरेदीचा निर्णय घेतला असून मार्च २०२६ पर्यंत टप्प्याटप्प्याने त्या गाड्या दाखल होणार आहेत. त्यानंतर सामान्य प्रवाशांचा तिकीट दर किमान तीन रुपयांनी कमी होणार आहे. सध्या महामंडळाला एकूण उत्पन्नातील सुमारे ९०० कोटी रुपयांचा खर्च सध्याच्या बसगाड्यांचे इंधन व देखभाल-दुरुस्तीवरच करावा लागत आहे. नवीन गाड्या आल्यानंतर तो खर्च किमान ६०० ते ७०० कोटींनी कमी होईल. त्यामुळे प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा देणे महामंडळाल शक्य होणार आहे.
महामंडळाच्या बसगाड्या
एकूण बस
१४,०००
दरमहिन्याचे प्रवासी
५५ लाख
इलेक्ट्रिक बस
१९०
सीएनजी बस
५००
नव्याने येणाऱ्या इलेक्ट्रिक बस
५,०००
इंधनावरील खर्चात होणार कोट्यवधींची बचत
सध्या इलेक्ट्रिक बस आणि डिझेलवरील बसच्या प्रवास दरात प्रतिकिमी पाच ते सहा रुपयांचा तर सीएनजी बसचा प्रवास दर डिझेलवरील बसच्या तुलनेत प्रतिकिमी सहा ते सात रुपयांनी कमी आहे. त्यामुळे डिझेलवरील बसगाड्या खरेदी बंद करण्यात आली असून पूर्वीच्या गाड्या कालबाह्य झाल्यानंतर महामंडळाकडून आता इलेक्ट्रिक व सीएनजीवर चालणाऱ्या बसगाड्या खरेदी केल्या जात आहेत. त्यातून महामंडळाची दरमहा अंदाजे २५० ते ३०० कोटींची बचत होवू शकते. त्यामुळे तिकीट दर कमी होवू शकतात.