Vidhan Sabha Election : विधानसभेत 6 आमदारांचा गेम होणार? दादांना धक्का देण्यासाठी शरद पवारांचं तगडं प्लानिंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शरद पवार गटाचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. आगामी विधानसभेतही सर्वाधिक जागा जिंकता यावा यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अजित पवार यांना धक्का देण्यासाठी शरद पवार यांनी तगडं प्लानिंग केलं आहे. आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यात दाखल होणार आहे. सलग तीन दिवस या यात्रेचा नाशिकमध्ये मुक्काम असणार आहे.

या यात्रेत राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे यांच्यासह महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहे. एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांची साथ सोडून अनेक आमदारांनी अजित पवारांची कास धरली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील तब्बल ६ आमदारांचा समावेश आहे.

यात देवळाली विधानसभा मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे, येवला मतदारसंघातील मंत्री छगन भुजबळ, दिंडोरीमधून नरहरी झिरवाळ, कळवणमधील आमदार नितीन पवार, निफाडचे आमदार दिलीप बनकर आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेलेले आहेत.

आगामी निवडणुकीत या आमदारांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार गटाने चांगलीच कंबर कसली आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते नाशिक जिल्ह्यात जंगी सभा घेणार आहेत. अजित पवार यांचे विश्वासून म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात देखील शरद पवार गटाकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सटाणा, देवळा आणि नाशिकमध्ये दाखल होईल. त्यानंतर याठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची जंगी सभा होईल. तर उद्या म्हणजेच मंगळवारी आणि परवा बुधवारी देखील नाशिक जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस नाशिककरांना राजकीय सामना पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *