महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। Saptashrungi Road Closed: नवरात्रौत्सवाच्या आधी नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. नांदुरीहून सप्तशृंगी गडावर जाणारा रस्ता ३ दिवस काही तासांसाठी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. २३, २५ आणि २६ सप्टेंबर असे ३ दिवस सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असून रस्त्यावरील कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदुरीहून सप्तशृंगी गडावर जाणारा रस्ता ३ दिवस काही तासांसाठी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. २३, २५ आणि २६ सप्टेंबर असे ३ दिवस सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या घाटातल्या रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या ठिकाणी सैल दगड काढणे आणि प्रतिबंधक जाळ्या बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
घाटामध्ये वारंवार दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे घाट रस्त्यावरील दरड प्रतिबंधक कामासाठी रस्ता बंद करण्यात येणार आहे. या तिनही दिवसात सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार आहे. आगामी नवरात्रोत्सव आणि कोजागिरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील महिन्यात म्हणजेच ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. तीन तारखेपासून घटस्थापना होणार आहे. या नवरात्रोत्सव काळात गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. राज्यभरातील लाखोंच्या संख्येने भाविक गडावर दर्शनासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी रस्त्याची डागडुजी केली जात आहे.