महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। रयत शिक्षण संस्थेला शरद पवार यांनी पाच कोटी रुपये जाहीर केले, असे कालेतील विकास पाटील यांनी सांगितले, ते चुकीचे आहे. महाराष्ट्र सरकारची सत्ता आमच्या हातात असताना त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याकडे मी कुंभोजच्या शाळेसाठी रयत शिक्षण संस्थेचा सन्मान व्हावा म्हणून मोठी देणगी द्यावी आणि त्याची तरतूद बजेटमध्ये करावी, असे सांगितले होते. हा माझा सल्ला राज्य सरकारने मान्य करून बजेटमध्ये पाच कोटींची तरतूद केली. त्यातील तीन कोटी रुपये वर्ग केले आहेत. अजून दोन कोटी रुपये राज्य सरकारकडून येणे बाकी आहे. आता दोन महिन्यांनंतर तुम्ही परिस्थिती बदलाल, त्यानंतर राहिलेली रक्कम संस्थेला लगेच देऊ, असे सूचक वक्तव्य खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी काले येथे केले.
दरम्यान, शाळेला एक कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. कालेत लोकसभागृहासह रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) निधीतून उभारलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते आज झाले. त्यानंतर ते बोलत होते.