महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। नुकतंच टीम इंडियाने चेन्नईमध्ये बांगलादेशाचा टेस्ट सामन्यात पराभव केला. या सामन्यात भारताने २८० रन्सने बांगलादेशाचा पराभव केला. दरम्यान या टेस्टच्या निकालानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलचं गणित पूर्णपणे बदललं आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्सट टेबलमध्ये 10 सामन्यांत 7 विजयांसह भारताचे 86 पॉईंट्स आहेत. याशिवाय भारताची विजयाची टक्केवारी 71.66 असून टीम पहिल्या स्थानी आहे.
दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची टीम
यावेळी टीम इंडिया पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची टीम आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियापेक्षा टीम इंजिया 9.16 टक्के पॉईंट्सने पुढे आहे. दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरणार की नाही हे अजून निश्चित झालेलं नाही.
दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया टीमच्या खातात 62.50 टक्के पॉईंट्स आहेत. या दोन टीम्सव्यतिरिक्त 7 टीम्सना 60 टक्क्यांपेक्षा कमी पॉईंट्स आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. आगामी WTC ची फायनल गाठायची असल्यास टीम इंडियाला अजून किती सामने जिंकावे लागणार आहेत, ते पाहूयात.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेची २०२३-२०२५ ही तिसरी वेळ आहे. पहिल्या दोन्ही स्पर्धांच्या फायनलमध्ये टीम इंडियाने स्थान पटकावलं होतं. मात्र एकदाही टीम इंडियाला ही स्पर्धा जिंकता आली नाही. 2019-21 च्या स्पर्धेत न्यूझीलंडने तर 2021-23 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली होती. त्यामुळे आगामी वर्षात ही स्पर्धा जिंकण्यासाठी टीम इंडिया सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे.
टीम इंडियाला अजून किती सामने जिंकावे लागणार
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या फेरीमध्ये टीम इंडियाला अजून ९ सामने खेळावे लागणार आहेत. यामध्ये बांगलादेशाविरूद्ध एक टेस्ट सामना बाकी आहे. यानंतर भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात टेस्ट सिरीज होणार असून यामध्ये भारताला ३ टेस्ट खेळायच्या आहेत. तर त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला अजून ५ टेस्ट सामने खेळायचे आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान पटकावायचं असेल तर टीम इंडियाला उर्वरित ९ पैकी ५ टेस्ट सामने जिंकणं भाग आहे. जर टीम इंडिया घरच्या मैदानावर उर्वरित ४ सामने जिंकते तर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर टीम निश्चिंतपणे जाऊ शकते.
टीम इंडियाने पुढच्या 9 पैकी 5 टेस्ट जिंकल्या आणि 4 मध्ये पराभवाचा सामना केला तर त्यांच्या खात्यात 63.15 टक्के पॉईंट्स होणार आहे. WTC च्या इतिहासात फायनलसाठी 60 पॉईंट्स पुरेसे असतात. त्यामुळे आता आगामी काळात टीम इंडियाला ५ टेस्ट जिंकाव्या लागणार आहेत