महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंचा प्रसाद बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी वापरली जाते, असा खळबळजनक आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली. मात्र, वायएसआर पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. लाडूंचा प्रसाद फक्त शुद्ध तुपापासून बनवला जातो, असं वायएसआर पक्षाचे म्हणणे आहे. अशातच या आरोप प्रत्यारोपानंतर बालाजी मंदिरात तब्बल ४ तास शुद्धीकरण करण्यात आल्याची माहिती आहे.
तिरुपती बालाजीचे मंदिर पुन्हा पवित्र करण्यासाठी विधीवत शुद्धीकरण केले जात असल्याची माहिती आहे. वायएसआरच्या राजवटीत मंदिरात केलेल्या कथित अपवित्र कृत्यांना सुधारण्यासाठी 4 तासांचे शांती हवन करण्यात आलं, असं वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलं आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील सूत्रांनी देखील याला दुजोरा दिल्याची माहिती आहे.
वृत्तानुसार, आज सोमवारी सकाळी ६ वाजता सुरू झालेला होम हवनाचा हा विधी १० वाजेपर्यंत चालला आहे. या हवनाचा उद्धेश मंदिराला शुद्ध करून भगवान व्यंकटेश्वर स्वामींना प्रसन्न करणे असल्याचा तेलगु देसम पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. यापुढे लाडूंमधील तुपातील भेसळ सातत्याने तपासण्यात येईल, तसेच भक्तांना शुद्ध तुपाच्या लाडूंचा प्रसाद देण्यात येईल, असंही तेलगु देसमच्या नेत्यांनी सांगितलं आहे.
लाडूंमधील भेसळ कशी उघड झाली?
याआधी आंध्र प्रदेशात वायएसआर पक्षाचे सरकार होते. मात्र, जून महिन्यात त्यांची सत्ता गेली आणि चंद्रबाबू नायडू यांची तेलगु देसम पार्टी सत्तेत आली. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चंद्रबाबू नायडू यांनी मंदिरातील लाडूंमध्ये भेसळ होण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने लाडूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या तुपाचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठवले. त्यानंतर लॅबच्या अहवालात धक्कादायक खुलासे झाले.
प्रयोगशाळेच्या अहवालात असे दिसून आले की, शुद्ध तुप बनवण्यासाठी दुधात फॅटचे प्रमाण 95.68 ते 104.32 पर्यंत असावे लागते. परंतु नमुन्यांमध्ये दुधाच्या फॅटचे प्रमाण केवळ 20 टक्केच आढळून आले. त्यामुळे हे भेसळयुक्त तूप असल्याचा आरोप चंद्रबाबू नायडू यांनी केला. इतकंच नाही तर या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जाते, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. यामुळे आंध्र प्रदेशच्या राजकारणासह संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली.
तिरुपती बालाजीच्या लाडूंची खासियत काय?
दरम्यान, भारतातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये तिरुपती बालाजी मंदिराचे नाव येते. येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना लाडूंचा प्रसाद दिला जातो. तब्बल 300 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. या लाडूंची खास गोष्ट म्हणजे ते बरेच दिवस खराब होत नाही. काही दिवस ठेऊन तुम्ही ते आरामात खाऊ शकता. तसेच त्याची किंमत देखील 10 ते 25 रुपयांपर्यंत आहे. म्हणूनच इथे येणारे जवळजवळ प्रत्येकजण हा प्रसाद घेऊन येतो.