महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. २४ जुलै : सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कुणीही गाफील न राहता आवश्यक ती काळजी घ्यावी. लस आपल्या हातात येत नाही, तोपर्यंत कोरोनावर विजय मिळवणं अशक्य असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोंदवलं.
उस्मानाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसरात उभारण्यात आलेल्या कोव्हिड-19 तपासणी केंद्राचं लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. याप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्राला कोरोनासंदर्भात सर्वोत्तम आरोग्य सुविधा देणारं राज्य बनवण्याचे आपले स्वप्न आहेत. सध्याच्या काळात आपण कितीही कोरोना तपासणी प्रयोगशाळा उघडल्या तरी त्या अपुऱ्या ठरू शकतील. त्यामुळे सध्यातरी कोरोनावरची लस येईपर्यंत सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे, मास्कचा वापर हे नियम आपल्याला कठोरपणे पाळावे लागतील, असं ठाकरे म्हणाले.