![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ सप्टेंबर ।। सरकारी कार्यालयात हेलपाटे घालायचे म्हटलं की अख्खा दिवस जातो. मात्र, काही कागदपत्रे हे अत्यंत गरजेचे असतात. त्यामुळे, हेलपाटे मारुन का होईना ते काढावेच लागतात.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शासकीय कार्यालये स्मार्ट होत आहेत. शासनाचा सर्वच कारभार आता ऑनलाइन होत असून बहुतांश कामे आता ऑनलाइन होत असल्याने नागिरकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचत आहे.
गावस्तरावर राहणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायत यंत्रणेच्या कार्यपद्धतीमुळे आवश्यक असणारे दाखले मिळवताना अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी शासनाने आता ‘महा-ई- ग्राम सिटिझन कनेक्ट अॅप’ विकसित केले.
महाई-ग्राम अॅपमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायतीमार्फत दिला जाणारा दाखला काढता येत आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या पंचायतराज संस्थांसाठी तयार केली आहे. अत्याधुनिक साधनांचा वापर करून सूचीबद्ध पद्धतीने माहितीचे सादरीकरण ‘महा-ई-ग्राम’मध्ये आहे.
या अॅपद्वारे जन्माचा दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, पाणीपट्टी, घरपट्टी, नमुना ८ दाखला एवढेच नव्हे, तर ग्रामपंचायतीला सूचनाही देता येतात आणि कराचा भरणाही करता येतो.
मोबाइलमध्ये प्ले स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर रजिस्ट्रेशन की वर क्लिक करावे. संबंधित माहिती भरल्यानंतर लगेच ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइलवर युजर आयडी आणि पासवर्ड येईल. याद्वारे या अॅपच्या माध्यमातून व्यवहार करता येईल.