महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ सप्टेंबर ।। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शहरात आज, गुरुवारी सभा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या, शुक्रवारी सभा होणार आहे. या सभेत माजी आमदार बापू पठारे यांच्यासह काही माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याने पवार कोणकोणत्या पक्षाला ‘धक्का’ देणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. युतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे भाजपकडून तिकीट मिळण्याच्या पठारेंच्या आशा मावळल्या होत्या. त्यामुळे तुतारीच्या चिन्हावर ते टिंगरेंच्या विरोधात निवडणूक लढतील अशी शक्यता आहे.
कोण आहेत बापू पठारे?
बापू पठारे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकाआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी नगरसेवक आणि महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद भूषवलं आहे. २००९ मध्ये वडगाव शेरी मतदारसंघातून ते विजयी झालेले होते. मात्र २०१४ मध्ये भाजपच्या जगदीश मुळीक यांनी बापू पठारेंचा पराभव केला होता.
‘खराडी येथील झेन्सार कंपनीच्या मैदानावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची सभा होणार आहे. माजी आमदार बापू पठारे यांचा मुंबई येथे नुकताच पक्षप्रवेश झाला. मात्र, जाहीर सभेच्या माध्यमातून त्यांचा तसेच काही माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. पाऊस असल्यास पठारे बंदिस्त मैदानात सभा होईल,’ असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.