महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ सप्टेंबर ।। मुंबई, पुणे, रायगडसह महाराष्ट्रात बुधवारी (ता. २५ सप्टेंबर) दुपारपासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. या जोरदार पावसामुळे मुंबई, पुण्यामध्ये अनेक भागांमध्ये पाणी साचले असून जनजिवन विस्कळीत झाले. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवाही ठप्प झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अनेक ठिकाणी झाड कोसळल्याच्या, विज पडून मृत्यू झाल्याच्याही दुर्दैवी घटना घडल्या. दरम्यान, आजही मुंबई, पुणे, रायगड पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनाही गरज असल्यास घराबाहेर पडण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळा बंद
भारतीय हवामान विभागाने मुंबईसह महानगरामध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईमधील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये गुरुवार (ता. २६ सप्टेंबर) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यालाही बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. कालच्या धुवांधार बॅटिंगनंतर पालघर जिल्ह्यात आजही रेड अलर्ट असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (गुरुवार, ता. २६ सप्टेंबर) पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही शाळांना सुट्टी
भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही वादळ व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी रात्री उशिरा यासंबंधीचे आदेश दिले आहेत.
सकाळपासून पावसाची विश्रांती!
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये काल दुपारपासून कोसळणाऱ्या पावसाने आज पहाटेपासून विश्रांती घेतली आहे. कालच्या पावसामुळे शहरात काही सखल भागात पाणी साचले होते. तसेच रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला होता. सध्या कोणत्याही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले नसल्याची माहिती देण्यात आली असून मध्यरेल्वेची वाहतूक सुरळित सुरु आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल ५-१० मिनिट उशिराने धावत आहेत.
पंतप्रधान मोदींच्या सभेवर पावसाचे सावट!
पुणे मुंबईमध्ये पावसाने थैमान घातले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्याला पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींची पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर नियोजित सभा होणार आहे. मात्र कालपासून पडलेल्या पावसामुळे सभेच्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे गरज पडल्यास मोदींच्या सभेचे ठिकाण बदलले जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच पर्यायी सभा स्थळ म्हणून निवडण्यात येणार असून पाऊस आणि हवामान तपासल्यानंतरच आयोजकांकडून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.