सीएसआर निधीच्या माध्यमातून महापालिकेच्या वतीने आरोग्यवर्धिनी केंद्राची उभारणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ सप्टेंबर ।। शहराला पायाभूत सुविधा पुरविताना इतर सुविधांसोबत वैद्यकीय सुविधांमध्येही आधिकाधिक सुधारणा करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्यातील काही प्रकल्पांमध्ये किंवा विकासकामांमध्ये सी.एस.आर निधीचा महत्वाचा वाटा आहे. सी.एस.आर निधीसोबत शहरातील विविध नामवंत कंपन्यांच्या अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शनही महापालिकेस लाभले असून फुगेवाडी येथे उभारण्यात आलेले आरोग्यवर्धिनी केंद्र त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांगवी रुग्णालयाच्या अंतर्गत फुगेवाडी येथे आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

या उद्घाटन समारंभास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, सांगवी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, सीएसआर सेल सल्लागार श्रुतिका मुंगी तसेच थायसेनक्रुप उद्योग समुह सीएसआर सेलच्या पुजा, दिव्या आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, सीएसआर सेलच्या माध्यमातून शहरात अनेक लोकपयोगी कामे होऊ शकतात आणि महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले आरोग्यवर्धिनी केंद्र याचे उत्तम उदाहरण आहे. शहरात विविध ठिकाणी आणखी ६७ आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या आरोग्यवर्धिनी केंद्रांद्वारे नागरिकांना अनेक उपचार मोफत दिले जाणार आहेत. त्यामध्ये वृद्धावस्थेतील नागरिकांच्या आरोग्याबाबत समस्यांची तपासणी, सहाय्यक उपचार आणि समुपदेशन, आशांमार्फत क्षेत्रातील सर्व वृद्ध नागरिकांच्या आरोग्याची देखरेख आणि तज्ञांमार्फत सल्ला आणि समुपदेशन अशा विविध सुविधांचा समावेश आहे. तसेच याठिकाणी प्रथमोपचारासाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा पुरविण्यात येत असून आजूबाजूच्या परिसरातील बालकांचे लसीकरणही या केंद्राद्वारे केले जाणार आहे.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, आशा सेविकांमार्फत परिसरातील सर्व नागरिकांना आरोग्यवर्धिनी केंद्राबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. फुगेवाडी येथे उभारण्यात आलेल्या या केंद्रामुळे आजूबाजूच्या परिसरातील सुमारे १२ हजार नागरिकांना याचा लाभ होणार आहे. शहरातील आणखी ६७ ठिकाणी या केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे जेणेकरून झोपडपट्टीसदृश भागात किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्यास मदत मिळेल. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे केंद्र सुरू राहणार असून येत्या काही दिवसांत मनुष्यबळ वाढवून सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत केंद्र सुरू ठेवण्याचा महापालिकेचा मानस आहे, जेणेकरून ज्यांना कामामुळे सकाळी उपचार घेणे शक्य नसेल ते संध्याकाळीही उपचारासाठी डॉक्टरांची भेट घेऊ शकतात.

आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एकूण ७ कक्ष उभारण्यात आले आहे. या सात कक्षांमध्ये केस पेपर नोंदणी, बाह्यरुग्ण विभाग, इंजेक्शन व ड्रेसिंग रूम, प्रयोगशाळा विभाग, औषध वाटप, नियमित लसीकरण कक्ष, वेलनेस ऍक्टिव्हीटी रुम आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. सीएसआर निधीतून उभारण्यात आलेल्या या केंद्रासाठी थायसेनक्रुप या कंपनीने सर्व सामग्री तसेच उभारणीचे कामकाज केले आहे. या केंद्राद्वारे गर्भधारणा आणि बाळंतपणाची काळजी, नवजात आणि अर्भकांची काळजी, बालपण आणि पौगंडावस्थेतील आरोग्य, कुटुंब नियोजन आणि गर्भनिरोधक सेवा, संसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन, विविध आरोग्य कार्यक्रम, नेत्ररोग आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा अशा विविध सेवा पुरविण्यात येणार आहेत, अशी माहितीही आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी यावेळी दिली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *