वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटेना; पुणे-सातारा महामार्गावर तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ सप्टेंबर ।। पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्गवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्राधिकरणाचा ठेकेदारावर अंकुश नसल्याने चुकीच्या पद्धतीने सुरु असलेले रुंदीकरण, महामार्गावर रस्त्यावर पडलेले खड्डे, तर एका-मागोमाग थांबलेलेली वाहने..कासवगतीने होणारी उड्डाणपुलाची कामे, यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून प्रशासनाचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे. यामुळे प्रवाशी हैराण होत असून काम करणाऱ्या ठेकेदारावर संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे सातारा महामार्गावर शिवरे ( ता. भोर ) येथे कासववतीने उड्डाणपुलाचे काम सुरू असून वाहतूक पोलिसांचे देखील लक्ष नसल्याने शनिवारी ( दि. २८ ) रोजी प्रचंड वाहतुक कोंडीमुळे वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा शिवरे उड्डाणपूलापासून ते कोंढणपूर फाटापर्यंत लागल्या होत्या. यावेळी वाहतुकीचे नियमन करणारे पोलीस यांचे नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीत आणखीच भर पडत होती.

शिवरे, खेडशिवापूर येथील उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्त्यावरून मार्गक्रमण होणाऱ्या वाहनाचा वेग मंदावत असल्याने जवळपास तीन किमी. अंतरापर्यंत वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहनाला पास होण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास लागले. यामुळे अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचता न आल्याने मानसिक त्रास सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबधित ठेकेदार आणि महामार्ग पोलीस कानाडोळा करत असल्याने सुट्टीच्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

शिवरे ( ता. भोर ) तसेच खेडशिवापूर येथील उड्डाणपुलाचे नियोजनशून्य पद्धतीने व संथगतीने काम सुरु आहे. याठिकाणी रोजच वाहतूक कोंडीही नित्याचीच झाली आहे. वाहतूक कोंडी झाल्यानंतर स्थानिक रहिवाशी युवक वाहतूक कोंडी सुरुळीत करण्यासाठी मदत करतात. सुट्टीच्या दिवशी मात्र परतीच्या मार्गाला निघालेली प्रवांशी वाहनाची संख्या जादा असल्याने अनेकदा मेगाब्लॉकचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. या दयनीय परिस्थितीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठेकेदारावर कारवाई करा..

काम करणाऱ्या ठेकेदाराकडून सतत कामात चुकारपणा होत असल्याने प्रवाशांना मात्र इच्छित स्थळी पोहचण्यात विलंब लागत आहे. चुकीच्या पद्धतीने रुंदीकरण करणारे काम करणाऱ्या संबधित ठेकेदारांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करून प्रवाशांची सुटका करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *