महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ सप्टेंबर ।। लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसे राहणार नाही आणि तिजोरी रिकामी होईल, असं मोठ विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करतांना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी, महिलांना असे पैसे दिल्यापेक्षा त्यांच्यासाठी नवनवीन उद्योग आणले पाहिजे. त्यांना रोजगार देऊन सक्षम केलं पाहिजे. समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो. राज्य खड्ड्यात घातल्या जात असेल तर ते चुकीचं आहे. ऑक्टोंबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीत तिजोरीत ठणठणाट होऊ शकतो. असं म्हटलं. दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचं महाविकास आघाडीच्या नेत्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केलं आहे. राज्यासाठी राबराब राबणाऱ्या नोकरदारांचे पगार करायला जर सरकारकडे पैसे नसतील तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही, असं प्रणिती शिंदे यांनी म्हंटलं आहे.