महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० सप्टेंबर ।। राज्यातील ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये चिकुनगुनियाचा संसर्ग वाढत असून पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर या महापालिका क्षेत्रांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत चिकुनगुनियाच्या तीन हजार २५९ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १४७० रुग्ण या चार महापालिका क्षेत्रांमधील आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या दुपट्टीने वाढल्याचेही आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.
शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस जास्त झाला. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने यंदा शहारांमध्ये झिका, डेंगी, मलेरिया आणि चिकनगुनियाचे यासारखे कीटकजन्य आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात गेल्या वर्षी २०२३ मध्ये चिकुनगुनियाच्या १७०२ रुग्णांची नोंद झाली होती. यंदा २१ सप्टेंबरपर्यंत ३२५९ रुग्ण आढळून आले आहेत. यंदा रुग्ण वाढीबरोबरच प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे आढळून येत असून काही रुग्णांमध्ये गुंतागुंत दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. राज्यात २००६, २०१०, २०१६ या वर्षांमध्ये चिकुनगुनियाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्या वेळी देखील रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून आली होती. राज्यात दर पाच ते सहा वर्षांनी या प्रकाचा संसर्ग वाढतो. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर आजार वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.
पुणे विभागात १९३ रुग्ण
कोल्हापूर विभागात २१९ रुग्ण
अमरावती विभागात १५६ रुग्ण
अकोला विभागात १२९ रुग्ण
सर्वाधिक रुग्ण असलेले महापालिका क्षेत्र
पुणे – २२७
नागपूर – ७४१
मुंबई – ३३८
कोल्हापूर – १६४
