Gold Price Hike | दहा दिवसांत सोने तीन हजारांनी वधारले तर चांदीत ……

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० सप्टेंबर ।। पितृपक्षातदेखील सोने-चांदीचे दर सातत्याने वाढल्याने, दसरा-दिवाळीत सोने ८० हजार, तर चांदी लाखांच्या पार जाण्याची दाट शक्यता आहे. मागील दहा दिवसांत सोने तीन, तर चांदी पाच हजारांनी वधारली आहे. सोने-चांदी खरेदी सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली असली तरी, गुंतवणूकदारांकडून मात्र या संधीचा चांगलाच फायदा घेतला जात असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर वाढत आहे. दिवाळीपर्यंत सोने ८० हजार, तर चांदी एक लाखाच्या पार जाण्याची शक्यता यापूर्वीच सराफ व्यावसायिकांनी वर्तविली आहे. दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीसाठी सराफ बाजारात मोठी गर्दी होत असते. यावेळी मात्र विपरीत स्थिती बघावयास मिळण्याची शक्यता आहे. दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने, सोने-चांदी खरेदी करताना मध्यमवर्गीय ग्राहकांकडून हात आखडता घेतला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सोने-चांदी खरेदीकडे गुंतवणूकदार सरसावल्याने त्यांच्याकडून मोठी खरेदी होत असल्याने, सराफ व्यावसायिकांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, सोने-चांदी दराचा विचार केल्यास गेल्या दहा दिवसांत २४ कॅरेट सोने तोळ्यामागे दोन हजार ९५० रुपयांनी, तर २२ कॅरेट सोने तोळ्यामागे दोन हजार ७०० रुपयांनी वधारले आहे. दुसरीकडे चांदीतील तेजी कायम असून, गेल्या दहा दिवसांत किलोमागे चार हजारांनी वाढले आहेत. त्यामुळे सोने आणि चांदी दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वोच्च दर नोंदवतील, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

Summary
सोने दर (जीएसटीसह)

२४ कॅरेट – प्रति १० ग्रॅम – ७७४३०

२४ कॅरेट – प्रति १० ग्रॅम – ७०९८०

चांदी – प्रति १ किलो – ९५ हजार

पितृपक्षातही तेजी कायम
पितृपक्षात सोने-चांदी खरेदी करणे अशुभ मानले जात असल्याने, या काळात दरात घट होईल किंवा दर स्थिर राहतील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, पितृपक्षातही दरांमधील तेजी कायम राहिल्याने, विक्रमी दर नोंदविले जात आहेत. गेल्या दहा दिवसांत सोन्यात तब्बल सहा वेळा तेजी नोंदविली गेली. तर चांदीमध्ये चार वेळा तेजी नोंदविली गेली. दरवाढीस आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत असल्याचे सांगितले जात असले तरी, वाढते दर खिशाला झळ पोहोचविणारे असल्याचे ग्राहक सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *