पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्क्यावर धक्के पाहायला मिळण्याची शक्यता ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० सप्टेंबर ।। पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. अजित पवारांसाठी पिंपरी चिंचवडचा गड महत्त्वाचा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन पक्ष निर्माण झाले. त्यात लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी महायुतीला धूळ चारत आपले वर्चस्व पुन्हा दाखवून दिले. त्यामुळे संपूर्ण राज्याचे राजकारण हे शरद पवारांभोवती फिरु लागले आहे. अजित पवार गटाचे अनेक इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या पक्षांमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात डाव टाकायला सुरुवात
विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापली गणितं आखत आहेत. शरद पवार यांनीही अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात डाव टाकायला सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवडचे अनेक माजी नगरसेवक शरद पवारांकडे जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यातील अजित गव्हाणे, नाना काटे, भाऊसाहेब भोईर हे अजित पवारांचे खंदे समर्थक शरद पवारांकडे जाण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. मात्र या सर्वाचा अजित पवारांनी विचार करणे गरजेचे आहे. एवढी वर्ष निष्ठावान राहून देखील पक्षामध्ये कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आम्ही वेगळा विचार करत असल्याचे या स्थानिक नेत्यांकडून खुलेपणाने सांगितले जात आहे.अजित गव्हाणे यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर आता चिंचवड विधानसभेसाठी नाना काटे देखील शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर अगदी कालपर्यंत अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे भाऊसाहेब भोईर देखील वेगळा विचार करण्याच्या तयारीत लागले आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे.

अजित पवारांना आपले शिलेदार रोखणे अत्यंत महत्त्वाचे
येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्क्यावर धक्के पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचा अजित पवारांनी वेळेत विचार करून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना थांबवणे गरजेचे आहे. शरद पवारांकडून अजित पवारांच्या आमदारांसाठी सेटिंग लावली जात असली तरी अजित पवारांनी देखील आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. नाहीतर एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला असलेला पिंपरी चिंचवड, जिथे फक्त अजित पवारांचा शब्द चालायचा, त्या ठिकाणी पक्षाची वाताहत होण्यास वेळ लागणार नाही, असे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. म्हणूनच अजित पवारांना आपले शिलेदार रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *