Navratri Utsav | यंदा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा, जाणून घ्या घटस्थापना मुहूर्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० सप्टेंबर ।। आश्विन शु. प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी गुरुवारी, नवरात्रारंभ / घटस्थापना होणार असून या दिवशी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे ५ पासून दुपारी १.४५ पर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल. यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे आहे. दिनांक ७ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी असून दिनांक १० ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. दिनांक ११ रोजी महाष्टमीचा व नवमी उपवास एकाच दिवशी असून दिनांक १२ ऑक्टोबर रोजी शनिवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ति) आणि दसरा आहे.

वयोमानामुळे किंवा आरोग्य विषयक अडचणींमुळे ज्यांना नवरात्रीचे ९ दिवस उपवास करणे शक्य नाही, त्यांनी उठता बसता म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा. मात्र ते ही शक्य नसल्यास किमान अष्टमीचा उपवास तरी करावा.

अशौचामुळे किंवा इतर काही अडचणींमुळे ज्यांना ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्तिनंतर (अशौच संपल्यावर) ५ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर, १० ऑक्टोबर किंवा ११ ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व १२ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे.

महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते. त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. मात्र, दुर्गाष्टमी ११ ऑक्टोबर रोजी आहे.

विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे १२ ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.२२ ते ३.०९ या दरम्यान आहे, अशी माहिती दाते पंचांगकर्ते यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *