महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑक्टोबर ।। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ३ नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरवात होणार असून, तत्पूर्वी सामान्यांना सणासुदीत १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय अपेक्षित आहे. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी निर्णय झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील चार लाख ६५ हजार लाभार्थींसह राज्यातील साडेसहा कोटी लाभार्थींना दिवाळी आनंदात साजरी करता येणार आहे.
आनंदाचा शिधामध्ये प्रत्येक रेशनकार्ड धारकास एक किलो साखर, एक किलो तेल आणि तेवढाच रवा व हरभरा डाळ दिली जाते. अवघ्या १०० रुपयांत या चार वस्तू लाभार्थींना दिल्या जातात. मागील दिवाळी सणात राज्य सरकारने राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील रेशनकार्डधारकांना हा आनंदाचा शिधा दिला होता. याही वर्षी गौरी-गणपतीला सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला.
आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. १० ऑक्टोबरनंतर कोणत्याही क्षणी विधानसभेची आचारसंहिता जाहीर होईल, असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी दिवाळीत सामान्य कुटुंबांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय अपेक्षित आहे. दिवाळी नेमकी निवडणूक काळात येत असल्याने त्या कालावधीत आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी सरकारला निवडणूक आयोगाची देखील परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून लवकर निर्णय अपेक्षित असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.