महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑक्टोबर ।। खाद्य तेल, हरभरा डाळीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता साखर आणि तांदळाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील संपूर्ण बंदी उठवली आहे.
सोबतच साखरेच्या उत्पादनात यंदा दहा लाख टन घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तांदूळ आणि साखरेच्या दरात प्रतीकिलो दोन रुपये किलो वाढीचे संकेत मिळू लागले आहेत. यामुळे ऐन दसरा, दिवाळीच्या सणात महागाईचा फटका सामान्यांना बसण्याची शक्यता आहे.
शेतमालाच्या किंमती नियंत्रणात राहाव्या यासाठी केंद्र सरकारकडून नेहमीच आयात-निर्यात धोरणात बदल केला जातो. ज्याचा थेट परिणाम किंमतींवर होत असतो. केंद्र सरकारने गेल्या वर्षीच्या जुलै २०२३ पासून तांदूळ निर्यातीवर बंदी घातली आहे. ती बंदी आता उठवण्यात आली. त्याचा परिणाम आता तांदळाच्या दरांवर होणार असल्याची शक्यता आहे.
देशातील सरकारी गोदामांमध्ये तांदळाचा पुरेसा साठा असताना आणि किरकोळ किंमतीही नियंत्रणात असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारने पांढऱ्या तांदळावरील शुल्क १० टक्के कमी करताना बिगर बासमती पांढऱ्या तांदळाला निर्यात शुल्कातून सूट दिली. दरम्यान निर्यात होणाऱ्या या तांदळावर किमान निर्यात मूल्यासोबत निर्यात शुल्काचीही अट असणार आहे.
केंद्र सरकाने आधी असलेले किमान निर्यात मूल्य २० टक्क्यावरून १० टक्के करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असून त्यासंदर्भातील परिपत्रक लवकरच निघण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पण सध्या भात उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र, ग्राहकांचे खिसे हलके होणार असून येत्या काही दिवसांत तांदळाचे दर वाढण्याची चर्चा बाजारात आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
मागील वर्षी ८८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र प्रत्यक्षात ११० लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा मात्र, कृषी विभागाच्या अंदाजानुसार हेच उत्पादन ९० ते १०२ लाख टन होण्याची शक्यता वर्तविली आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या ऊस क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम साखर उताऱ्यावर होण्याची शक्यता आहे. तसेच सरकारकडे साखरेचा साठाही कमी झाला आहे. त्यामुळे साखर ४५ रुपये किलोवर जाण्याचा अंदाज आहे.