महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑक्टोबर ।। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा झाला आहे. आता पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र हप्ते येणार आहेत. मात्र त्याबरोबच आणखी एक मोठा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना अजित पवारांनी पुढच्या नऊ महिन्यांची तरतूद करुन ठेवल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना पुढचे नऊ हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही.
काय म्हणाले अजित पवार?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या उर्वरित नऊ महिन्यांसाठी 35 हजार कोटींची तरतूद केलेली आहे, त्यामुळे या योजनेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. महिलांच्या सन्मानासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले.
चौथा आणि पाचवा हप्ता १० ऑक्टोबरपर्यंत…
लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरपर्यंत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. हे पैसे महिलांच्या सन्मानासाठी आहेत. त्यामुळे त्याच्यावर महिलांचा अधिकार आहे, असं अजित पवारांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये परवा म्हटलं होतं.
बारामतीमध्ये अजित पवार काय म्हणाले?
बारामतीतील बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी आपल्यातील बदल अधोरेखीत केला. ते म्हणाले, या पुढील काळात मी कोणावरही टीका करत नाही, कार्यकर्त्यांनीही टीका करण्याच्या भानगडीत पडू नये, आपण केलेली विकासकामे मोठी आहेत, त्यामुळे ती कामेच आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ, मी आता तुम्हाला हसताना दिसतोय ना, अजित पवार आता विनम्र झालेले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनीही आता बदल करायला हवा असे अजित पवार यांनी सांगितले.
”बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झारगडवाडी येथील प्रस्तावित जनावरे बाजाराच्या 21 एकर जागेसाठी आठ कोटींची मागणी करण्यात आली होती, मात्र कॅबिनेटमध्ये चर्चा करुन ही जागा विनामूल्य बाजार समितीला मिळवून दिली आहे.” असंही अजित पवार म्हणाले.