महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ ऑक्टोबर ।। मावळ विधानसभेत विविध विकासकामांच्या उद्घाटना प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मावळत आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधीलच अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि लोकसभेचे प्रचार प्रमुख बापू भेगडे आणि बाबुराव वायकर यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यावरुनच आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सुनील शेळके यांचा हा आक्रमकपणा पाहून अजित पवारांनाही सबुरीने घेण्याचा सल्ला द्यावा लागला.
काय म्हणाले सुनील शेळके?
‘पाच वर्षात मी एकही पैसा खाल्लेला नाही, ग्रामदैवत पोटोबा महाराजांची शपथ घेऊन सांगतो. मी पैशासाठी आमदार झालो नाही. मात्र बदनामी करू नका. निवडणूकीची आचारसंहिता कधीही लागू शकते मावळात अनेक इच्छुक आहेत. संविधानाने सर्वांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. मात्र तुम्ही मायबाप जनतेला दहशतीखाली आणू नका. मावळची जनता प्रेमळ आहे ती एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करते. कुणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर सुनील शेळके शांत बसणार नाही,’ असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
तसेच ‘जन्माला आलेला प्रत्येक जण मरायला आला आहे. जर तुम्हाला दहशत करायची असेल, दादागिरी करायचे असेल तर ते या पट्ट्यावर करा सुनील शेळके वर करा. मायबाप जनतेवर करू नका. दादा मी तुमचा आदर्श घेऊन कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. कोण भाजपचा कोण शिवसेनेचा कोण काँग्रेसचा कधीही बघितलं नाही. फक्त विकासाचा ध्यास पुढे ठेवला,’ असेही सुनील शेळके यावेळी म्हणाले.
अजित पवारांनी कान टोचले..
दरम्यान, सुनील शेळके यांचा हा आक्रमकपणा पाहून अजित पवार यांनी जाहीर सभेत त्यांचे कान टोचले. आज सुनीलची गाडी जरा जास्तचं गरम होती. पण जरा सबुरीने घ्यायचं असतं, आपल्याला सर्वांची गरज असते. उगीचं काहीही बोलून साध्य होत नसते, असे अजित पवार म्हणाले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेची ही असतात की नाही? का त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतचं राहायचं? असे ते म्हणाले. त्यांच्या या भाषणची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.