महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ता. २८ जुलै -पुणे जिल्हयातील कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला आज (27 जुलै) दिलेत.पुणे हा सध्या राज्यातला कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट झाला असून इथल्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 48 हजारांवर गेली आहे. तर, मृतांची संख्या 1800 वर गेली आहे. पुण्यातली ही स्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आज (27 जुलै) बैठक घेतली. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह जिल्ह्यातले अधिकारी उपस्थित होते.यावेळी पुण्यातला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. ही रुग्णायलं कुठे आणि कशी उभारली जातील याबद्दल लवकरच माहिती देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार म्हणाले की, “कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी लागेल. पुणे शहरासह जिल्हयातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावं लागेल. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेतोपरी सहकार्य केलं जाईल.” कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी तसंच मंत्रालयस्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं. पवार पुढे म्हणाले की, “खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयाचं बिल स्वतंत्र लेखापरीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचारांची दरआकारणी केली आहे का, याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावे.”