Sharad Pawar vs Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी महायुतीला सुरुंग लावण्यास केली सुरुवात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑक्टोबर ।। पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी एकापाठोपाठ एक धमाके करत महायुतीच्या अडचणी वाढवल्या आहेत. भाजप, अजित पवार गटातील अनेक नेते तुतारी हात घेत आहेत. जागावाटपात संधी मिळत नसल्याचं लक्षात येताच अनेकांनी शरद पवार गटाची वाट धरली आहे. येत्या महिन्याभरात आणखी अनेक नेते तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार गटातील आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी नाराज आहेत. आता त्यांच्या मनधरणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची धावाधाव सुरु झाली आहे.

भाजप नेते आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी आजच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात शरद पवारांनी जोरदार बॅटिंग केली. इंदापुरात जसा कार्यक्रम झाला, तसाच कार्यक्रम १४ ऑक्टोबरला फलटणमध्ये होणार आहे. तसा तिथल्या लोकांचा आग्रह आहे, असं सूचक विधान पवारांनी केलं. साताऱ्याच्या फलटणचे बडे नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर लोकसभा निवडणुकीपासूनच महायुतीत नाराज आहेत. आपल्याला तुतारी फुंकायला किती वेळ लागतो, असं विधान त्यांनी गेल्याच महिन्यात केलं होतं.

एकीकडे रामराजे नाईक निंबाळकर जाहीरपणे तुतारी हाती घेण्याची भाषा करत असताना दुसरीकडे शरद पवारांनी १४ ऑक्टोबरला फलटणमधून निमंत्रण आल्याचं सांगत करेक्ट कार्यक्रम करण्याचे संकेत दिले. यानंतर अजित पवार गटात खळबळ उडाली आहे. रामराजेंची मनधरणी करण्यासाठी खुद्द अजित पवारांनी हालचाली सुरु केल्या आहेत. रामराजेंची उद्या मुंबईत भेट घेणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.

दुसरीकडे अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या चिंचवडमध्ये शरद पवारांनी फिल्डिंग लावली आहे. पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी जुलैमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला. यानंतर आता चिंचवडमध्ये दादांना धक्का देण्याची रणनीती शरद पवारांनी आखली आहे. त्यामुळे अजित पवारांची धावाधाव सुरु आहे.

चिंचवडमधील समर्थकांना अजित पवारांनी बारामतीत बोलावून घेतलं आहे. चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला न सुटल्यास मविआत जाण्याची भूमिका माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे बालेकिल्ला वाचवण्यासाठी अजित पवारांना बरीच कसरत करावी लागत आहे. पिंपरी-चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. पण आता तिथेच अजित पवारांची कसोटी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *