महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेत असून आतापर्यंत १२०० हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पवार यांनी घेतल्या आहेत. पुण्यातील निसर्ग कार्यालयात ग्रामीण महाराष्ट्रातील बहुतांश भागातील मुलाखती घेतल्यानंतर उद्या शरद पवार यांच्याकडून मुंबईतील कार्यालयात मुंबई शहरासह कोकण पट्ट्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मात्र ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे त्या बारामतीच्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम ठेवणंच शरद पवार यांनी पसंत केलं आहे. कारण बारामतीतून अद्याप एकाही इच्छुक उमेदवाराने मुलाखत दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुण्यातील निसर्ग कार्यालयात आज पुणे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. मात्र ज्या बारामती मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या बारामतीतून आज एकाही इच्छुकाने मुलाखत दिली नाही. फक्त बारामतीतील एका शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतल्याची माहिती पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीपासून अजित पवारांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. या निवडणुकीत बारामती तालुक्यातूनही सुप्रिया सुळे यांना ४८ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघात झालेली पवार विरुद्ध पवार राजकीय लढाई चांगलीच चर्चिली गेली. या लढाईचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना संधी देऊ शकतात. त्यादृष्टीने युगेंद्र पवार यांनी तयारी सुरू केली असून त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर दोनदा संपूर्ण तालुक्याचा दौराही केला आहे.