महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑक्टोबर ।। बनावट औषधांची विक्रीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. त्यातच आता एखादा आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या बोगस औषधांची विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशी औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांविरोधात मोहीम हाती घेतली. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील तीन औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत हमखास आजार बरा करणारे असा दावा करून औषधांची विक्री वाढली आहे. अशा बोगस औषधांमुळे ती घेणाऱ्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायद्यांतर्गत ५३ आजारांवरील उपचाराबाबत जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अशी औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत यंदा एप्रिलपासून आतापर्यंत तीन औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीची बोगस औषधे जप्त करण्यात आली आहे.
आजार बरा करण्याचा दावा करून विक्रेत्यांकडून औषधांची विक्री केली जाते. या औषधांची परवानगीविना विक्री केली जाते आणि ती बोगस असतात. यामुळे उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. – गिरीश हुकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग
औषध विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे आणि अशा औषधांची विक्री करू नये, अशी सूचना वारंवार केली जाते. अन्न व औषध प्रशासनानेही याबाबत विक्रेत्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी. विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी औषध कंपनीवर कारवाई केल्यास ही समस्याच निर्माण होणार नाही. – अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट