महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑक्टोबर ।। पाकिस्तानच्या संघाने घरच्या मैदानावर तब्बल १३३८ दिवसांनी कसोटी सामना जिंकला आहे. पहिल्या कसोटीत घरच्या मैदानावर लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानने मुलतानचे मैदान आज गाजवले. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावातही गडगडला आहे आणि त्यांच्या तळाच्या दोन फलंदाजांना पराभव टाळण्यासाठी आणखी १५९ करायच्या होत्या. प्रमुख फलंदाज माघारी परतल्यामुळे इंग्लंडचे जिंकणे अवघडच होते. पाकिस्तानचा Noman Ali ने ८ विकेट्स घेताना इंग्लंडला डावाने पराभूत केले.
Stokes loses control of his bat as Noman gets 5️⃣ 🏏#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/nG3m0c7BNX
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 18, 2024
पाकिस्ताला पहिल्या कसोटीत पहिल्या डावात पाचशेहून अधिक धावा करूनही डावाने हार पत्करावी लागली होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या कसोटीत संघात बदल करताना बाबर आझम, शाहिन आफ्रिदी, नसीम शाह आधी फॉर्मात नसलेल्या सीनियर्सना संघाबाहेर केले. बाबरच्या जागी संधी मिळालेल्या कारमान गुलामने पदार्पणात ११८ धावांची खेळी केली आणि सईम आयुब ( ७७), मोहम्मद रिझवान ( ४१), सलमान आघा ( ३१), नोमाल अली ( ३२) व आमेर जमाल ( ३७) यांच्या मदतीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात ३६६ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने चांगली सुरूवात दाखवली होती, परंतु साजिद खान ( ७-१११) व नोमान ( ३-१०१) यांनी इंग्लंडला धक्के दिले. इंग्लंडचा डाव २९१ धावांवर गुंडाळून पाकिस्तानने आघाडी घेतली.
पाकिस्तानला दुसऱ्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही आणि ते २२१ धावांवर गडगडले. सलमान आघा ( ६१) हा संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. इंग्लंडच्या शोएब बशीर ( ४-६६) व जॅक लिच ( ३-६७) यांनी चांगला मारा केला. २९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची तारांबळ उडाली. कर्णधार बेन स्टोक्स मैदानावर उभा राहिला होता, परंतु त्याला साथ मिळाली नाही. ब्रेडन कार्से ( २७) ने त्याला आधार दिला, पंरतु समोर लक्ष्य खूप मोठं होतं. स्टोक्स आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी पुढे आला, परंतु त्याच्या हातून बॅट निसटली अन् ती हवेत फेकली गेली. त्यानंतर रिझवानने चपळाईने स्टम्पिंग केले. स्टोक्सच्या विकेटनंतर इंग्लंडचा डाव गडगडला. इंग्लंडचा दुसरा डाव १४४ धावांवर आटोपल्याने पाकिस्तानने १५२ धावांनी हा सामना जिंकला.
नोमान अलीने दुसऱ्या डावात ४६ धावा देताना ८ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानसाठी नोमान ( ११) व साजिद खान ( ९) यांनी मिळून इंग्लंडच्या २० विकेट्स घेतल्या. या विजयासोबतच पाकिस्तानने कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे.
