महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑक्टोबर ।। विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. आजपासून विधानसभेचे अर्ज भरण्यास सुरुवात होत असून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी केली आहे. आज काँग्रेस नेते सत्यशिल शेरकर यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश होणार असून ते जुन्नरमधून विधानसभा लढवणार आहेत.
सत्यशिल शेरकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाल्यापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इनकमिंग सुरु आहे. भाजप, अजित पवार गटासह महायुतीमधील अनेक बडे नेते तुतारी हाती घेत विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेही शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. अतुल बेनके यांनी शरद पवारांच्या भेटी घेतल्याने या चर्चांना जोर आला होता, मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी घड्याळावर लढणार असल्याचे स्पष्ट करत तुतारीच्या चर्चांना फुलस्टॉप दिला होता.
जुन्नरमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी
अशातच आता अतुल बेनकेंना रोखण्यासाठी शरद पवार यांनीही मोठी खेळी केली आहे. अतुल बेनकेंच्या विरोधात शरद पवार यांनी तगडा उमेदवार शोधला असून काँग्रेस नेते आणि विघ्नहर्ता साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर आज तुतारी हाती घेणार आहेत. आज ११ वाजता मुंबई येथे शरद पवार गटात ते जाहिर प्रवेश करणार असून जुन्नरमध्ये अतुल बेनके विरुद्ध सत्यशिल शेरकर असा सामना रंगणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते जरांगेंच्या भेटीला..
दरम्यान, मनोज जरंगे यांनी अंतरवाली सराटीत न येण्याचे आवाहन करून देखील इच्छुक उमेदवार आणि नेते आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला येत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.चंद्रकांत दानवे हे जालन्यातील भोकरदन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.