महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ऑक्टोबर ।। राज्यात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज विदर्भ आणि कोकण या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज ३१ ऑक्टोबरला कोकण आणि विदर्भात पाऊस होईल. कोकणामधील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर आणि अमरावती वगळता इतर सर्वच ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यासोबतच उत्तर नगर आण उत्तर संभाजीनगर, पुणे आणि सातारा यासह १५ जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित २१ जिल्ह्यात स्वच्छ वातावरण असेल असे सांगण्यात आले आहे.
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे ४ दिवस पावसाची शक्यता असून ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल. त्यानंतर राज्यात सर्वच ठिकाणी हळूहळू थंडी पसरण्यास सुरूवात होईल.