Good News! सणासुदीत देशभरात हंगामी नोकऱ्यांमध्ये सुमारे २० टक्के वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ ऑक्टोबर ।। यंदा हंगामी किंवा सणासुदीच्या काळापुरत्या म्हणजेच एक महिन्यापासून तीन महिन्यांपर्यंतच्या काळासाठी दिल्या जाणाऱ्या रोजगारांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार २.१६ लाख नवे रोजगार निर्माण झाले आहेत. हे रोजगार मुख्यतः ई-कॉमर्स, क्यू-कॉमर्स, मालहाताळणी (लॉजिस्टिक्स अँड ऑपरेशन्स) आणि आदरातिथ्य या क्षेत्रांत निर्माण झाले आहेत.

वस्तूची किंवा खाद्यपदार्थांची मागणी केल्यावर ती चटकन पूर्ण करणाऱ्या अर्थात क्यू-कॉमर्स क्षेत्रातील ‘ब्लिंक-इट’, ‘झेप्टो’, ‘स्विगी’ यासारख्या कंपन्या असे हंगामी रोजगार मोठ्या प्रमाणावर देतात. याशिवाय ‘अमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘मिन्त्रा’, ‘मीशो’ यासारख्या ऑनलाइन वस्तूविक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्याही हंगामी रोजगार देतात. या वर्षी सणासुदीच्या दिवसांना जोडूनच विधानसभा निवडणुकीचा काळ असल्यामुळे दर वर्षीचा हंगामी नोकऱ्यांचा काळ कमाल तीन महिन्यांपेक्षा अधिक असेल, असे संदीप या डिलिव्हरी बॉयने (नाव बदलले आहे) ‘मटा’ला सांगितले.

या हंगामी नोकऱ्यांसंदर्भात रिटेलतज्ज्ञ गोविंद श्रीखंडे म्हणाले, ‘ही रोजगारभरती बहुतांश वेळा त्रयस्थ कंपनीकडून होते. या नोकऱ्या किमान एक माहिना आणि कमाल तीन महिन्यांसाठी असतात. यामध्ये डिलिव्हरी बॉय आणि गोदामांमध्ये मालाची वर्गवारी करण्यासाठी वेअरहाउस बॉय या स्वरूपाच्या नोकऱ्या प्रामुख्याने असतात. साधारण दरमहा १० ते २० हजार रुपये वेतन या मुलांना दिले जाते. मात्र, त्रयस्थ संस्थेकडून त्यांची नियुक्ती होत असल्यामुळे ही संस्था आठ ते १० टक्के रक्कम कापून वेतन या मुलांना देते.’

ई-कॉमर्स कंपन्यांच्या गोदामात पर्यवेक्षक असलेल्या संतोषने (नाव बदलले आहे) सांगितले, ‘केवळ महिनाभरासाठी किंवा कमाल तीन महिन्यांसाठी गोदामांमध्ये हंगामी कर्मचारी नेमले जातात. गोदामात आलेला माल व्यवस्थित साठवून ठेवणे, त्याचे लेबलिंग करणे, प्रतवारी करणे, मालाची डिलिव्हरी कमीत कमी वेळात व्हावी, यासाठी तो विभागवार मांडून ठेवणे आणि गोदामाची स्वच्छता राखणे अशा कामांसाठी माणसे लागतात. साधारणतः १५ ते २५ हजार रुपये महिना वेतन दिले जाते. त्यांनी चांगले काम केल्यास प्रोत्साहन भत्ताही मिळतो.’

क्षेत्र रोजगार वाढ
लॉजिस्टिक्स आणि ऑपरेशन्स- ७० टक्के
रिटेल व ई-कॉमर्स -३० टक्के
आदरातिथ्य -२५ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *