महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ नोव्हेंबर ।। दिवाळीचा सण सुरु झाला आहे. फराळ खाऊन आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन लोक आनंद व्यक्त केला जात आहे. देशात सर्वत्र दिव्यांची रोषणाई आणि फटाके फोडून सणाचा आनंद लुटत आहेत. दिवाळी म्हटलं की फटाके हे आलेच. भारतातील प्रत्येक शहराची स्वतःची कथा आहे आणि तामिळनाडूचे शिवकाशी शहर (Tamilnadu sivakasi) देखील त्याला अपवाद नाही. तुम्हाला जाणून अप्रूप वाटेल की तामिळनाडूतील या शहराला ‘फटाक्यांचे शहर’ म्हटले जाते. हे शहर त्याच्या भव्यतेसाठी आणि रंगीबेरंगी फटाक्यांसाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीसारख्या सणांवर, शिवकाशीमधील फटाके देशभरात प्रकाश आणि आनंद पसरवतात.
फटाके उद्योगाचे भांडवल
तामिळनाडूतील शिवकाशीमध्ये फटाके बनवणारे सुमारे 8000 छोटे-मोठे कारखाने आहेत. हे कारखाने भारतातील सुमारे ९०% फटाके तयार करतात. तिकडचे फटाके भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहेत. या उद्योगामुळे येथील अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो.
शिवकाशीमध्ये आहे तीन उद्योगांचा संगम
शिवकाशीला ‘तीन उद्योगांचे शहर’ असेही म्हंटले जाते. तिथे फटाक्यांच्या निर्मितीशिवाय माचिस आणि छपाईचाही मोठा उद्योग आहे. माचिसच्या उत्पादनात शिवकाशीचे योगदान सुमारे 80% आहे, तर छपाई उद्योगात ते 60% पर्यंत आहे. अशाप्रकारे माचिस निर्मिती, छपाई उद्योग आणि फटाके हे तीन उद्योग मिळून शहराची ओळख मजबूत करतात.
शिवकाशीचा इतिहास ६०० वर्ष जुना
शिवकाशीचा इतिहास ६०० वर्षांचा आहे. हे शहर राजा हरिकेसरी परकीरामाच्या कारकिर्दीशी संबंधित आहे. या राजाने तिथे भगवान शिवाचे मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. वाराणसीहून आणलेल्या शिवलिंगाची स्थापना याच शहरात करण्यात आली. शिवलिंगाची स्थापना झाल्यावर त्याचे नाव शिवकाशी ठेवण्यात आले. या धार्मिक पार्श्वभूमीने शहराला एक वेगळी ओळख दिली आहे. त्यामुळे शिवकाशी हे केवळ फटाक्यांचे शहर नाही तर उद्योग, संस्कृती आणि इतिहासामुळेही ते महत्त्वाचे ठरते. येथील फटाके प्रत्येक उत्सवाला खास बनवतात आणि हे शहर त्याच्या अनोख्या इतिहासासह एक वेगळं ठिकाण ठरते. शिवकाशी केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक अनोखा अनुभव देते.