दिल्ली; फटाक्यांच्या आतषबाजीने हवेचा दर्जा ‘अत्यंत खराब’, ३ वर्षांतील सर्वाधिक प्रदूषित दिवाळीची नोंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ नोव्हेंबर ।। दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाने शुक्रवारी सकाळी दिल्ली झाकोळली. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) धोक्याच्या पातळीवर, ४००च्या उंबरठ्यावर पोहोचला. दिल्लीत दिवसभर धुरक्याचा पडदा राहिल्याने नागरिकांना श्वास घेणेही अवघड बनले.

उत्तर भारतात दोन दिवस साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या पहिल्या रात्री, गुरुवारी दिल्लीतील अनेक भागांत फटाक्यांची आतषबाजी झाली. दिल्लीत फटाक्यांवर कायदेशीर बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन झाले. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर ‘एक्यूआय’ ‘अत्यंत खराब’ पातळीवर घसरला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांसारख्या प्रदूषण निरीक्षण संस्थांनुसार, गेल्या २४ तासांतही दिल्लीत ‘एक्यूआय’ ‘अत्यंत खराब’ पातळीवरच आहे.

दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या प्रदूषणाची पातळी चिंताजनकरित्या वाढली. पीएम २.५ ते पीएम ५ या विषारी वायुकणांचे प्रमाण मर्यादेच्या किमान ३० पटींनी वाढले होते. मानवी आरोग्यासाठी हे घातक आहे, असे ‘डीपीसीसी’चे माजी अतिरिक्त संचालक मोहन पी. जॉर्ज यांनी सांगितले. दिल्लीचा ‘एक्यूआय’ बुधवारी ३०७च्या पुढे नोंदवला गेला. यंदाची ही दिवाळी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक प्रदूषित ठरल्याचे आकडेवारी सांगते.

घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोकळ्या हवेत श्वास घेण्यास त्रास होत होता, डोळे जळजळत होते. अक्षरधाम मंदिरासह बहुतांश इमारती धुरक्याच्या सावलीत अस्पष्ट दिसत होत्या. शुक्रवार सायंकाळनंतर पुन्हा फटाक्यांचा दणदणाट सुरू झाला आणि शनिवारी, हवेची गुणवत्ता यापेक्षा गंभीर होणार का, या भितीतच दिल्लीकरांनी लक्ष्मीपूजनाचे विधी पार पाडले.

शेतातील पाचट जाळणे, फटाक्यांची एका रात्रीत प्रमाणाबाहेर आतषबाजी आणि अन्य कारणांमुळे दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेची पातळी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत घसरली आहे. यंदा वेगवान वाऱ्यामुळे ‘एक्यूआय’ अद्याप अतिगंभीर श्रेणीपर्यंत पोहोचलेला नाही. दिल्लीची भौगोलिक रचना एखाद्या बशीसारखी असल्याने वारा वाहत नसेल तर हवेतील दूषित वायुकण वातावरणातच राहतात आणि त्याचा श्वसनाला त्रास होतो.

हवा गुणवत्ता स्थिर; ‘डीपीसीसी’चा दावा
दिवाळीत दिल्लीच्या हवा गुणवत्ता निर्देशांकात फारसा बदल झालेला नसून, हवेची गुणवत्ता स्थिर आहे, असा दावा दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (डीपीसीसी) केला आहे. दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक गुरुवारी ३२८ नोंदला गेला होता. तो दुसऱ्या दिवशी ३६० इतका नोंदला गेला असून, त्यात फार मोठी वाढ नोंदवण्यात आलेली नसल्याचे समितीने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *