महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ नोव्हेंबर ।। यंदा बारामती विधानसभा मतदारसंघ प्रचंड लक्षवेधी ठरला. सख्खे काका – पुतणे या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहिले. या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राने काका-पुतण्यांचा सामना पाहिला आणि यंदाही काकाच पुतण्यापेक्षा वरचढ ठरला. दरम्यान, अजित पवार आणि युगेंद्रची तुलना होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर, आज अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
शरद पवार म्हणाले की, “बारामतीमधून कोणालातरी उभं करणं गरजेचं होतं. कोणाला उभं केलं नसतं तर महाराष्ट्रात काय संदेश गेला असता? आम्हाला माहीत आहे की अजित पवारांची युगेंद्रशी तुलना होऊ शकत नाही. अजित पवारांनी येथे बरीच वर्षे काम केलं आहे. सत्तेतील साथ हे एका बाजूला आणि नवखा तरूण उमेदवार एका बाजूला, त्यामुळे याची तुलना होऊ शकत नाही.”
अजित पवारांचा टोला
“युगेंद्र व्यवसाय करणाऱ्यातला आहे. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. माझ्या सख्खा भावाच्या मुलालाच म्हणजेच माझ्या पुतण्याला माझ्याविरोधात उभं करण्याचं काहीच कारण नव्हतं. मी सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली, चूक झाली. परंतु, चूक झाली म्हणजे घरातूनच माणूस उभा करायचा? असा खोचक प्रश्न अजित पवारांनी विचारला.
वादळी प्रचारानंतरही युगेंद्र पवारांचा पराभव
राज्याच्या राजकारणात बारामती विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष होतं. यानिमित्ताने कौटुंबिक प्रतिष्ठा तर पणाला लागलीच होती, पण राष्ट्रवादी पक्षाचं (शरद पवार) भवितव्य अवलंबून होतं. युगेंद्र पवारांकडे शरद पवारांचा पुढचा राजकीय वारस म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्क्याने येथे जिंकतील अशी आशा होता. त्यांच्याकरता शरद पवारांसह त्यांच्या पत्नीही प्रचारात उतरल्या होत्या. याबाबत अजित पवारांनी खंतही व्यक्त केली होती.परंतु, २३ नोव्हेंबरला जाहीर झालेल्या निकालात बारामतीचा गड अजित पवारांनी अभेद्य ठेवला आहे. त्यांना १ लाख ८१ हजार १३२ मते मिळाली असून युगेंद्र पवारांना ८० हजार २३३ मते मिळाली. म्हणजेच तब्बल १ लाखांच्या फरकाने युगेंद्र पवारांचा पराभव झाला. दरम्यान, बारामतीतून उमेदवार दिला नसता तर महाराष्ट्रात वेगळा संदेश गेला असता, अशी प्रतिक्रियाही शरद पवारांनी दिली.