भाजपच्या माजी मंत्र्यानेच केली फेर मतमोजणीची मागणी, ८ लाखही भरले; राज्याच्या राजकारणात खळबळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ नोव्हेंबर ।। विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यभरातून इव्हीएमवर शंका घेतल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी याविरोधात अधिकृतपणे अर्ज करून पडताळणी करून घेण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात भाजपचे कर्जत-जामखेडमधील उमेदवार प्रा. राम शिंदे यांनी यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे इव्हीएम विरोधात सोशल मीडियातून आवाज उठविण्यात आघाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातही इव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे. या मतदारसंघातून पवार अवघ्या १२४३ मतांनी विजयी झाले आहेत. रोहित पवारांच्या विरोधात असणारे भाजपचे राम शिंदे यांनी ८ लाख २४०० रुपयांचा शुल्क फेर मतमोजणीसाठी भरलेला आहे. याशिवाय जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन पराभूत उमेदवारांनीही लाखो रुपयांचे शुल्क भरून पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार प्रा. राम शंकर शिंदे यांनी इव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे. शिंदे यांनी मतदारसंघातील १७ बुथवरील पडताळणीची मागणी करीत त्यासाठीचे ८ लाख २ हजार ४०० रुपयांचे शुल्कही भरले आहे. राज्यभरात महाविकास आघाडीकडून इव्हीएम विरोधात मोहीम सुरू आहे. तर नगर जिल्ह्यात भाजपच्याच उमेदवाराने अशी मागणी केली आहे. त्याच मतदारसंघातून इव्हीएम विरोधात आवाज उठविणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा निसटता विजय झालेला आहे. त्यामुळे शिंदे यांनी वैयक्तिक पातळीवर ही मागणी केली की पक्षाचीच भूमिका आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरी मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि याच पक्षाचे कोपरगावमधील पराभूत उमेदवार संदीप वर्पे व पारनेरमधून राणी लंके यांनी हे अर्ज केले आहेत.

जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे त्यांनी अर्ज केले आहेत. नियमानुसार त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी ४७ हजार २०० रुपये याप्रमाणे पाच केंद्राचे २ लाख ३६ हजार रुपये शुल्क भरले आहे. लंके यांनी १८ बुथवरील यंत्राची पडताळणीची मागणी केली असून त्यासाठी ८ लाख, ४९ हजार रुपयांचे शुल्क भरले आहे. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांनीही फेर मतमोजणीची मागणी केलीय आणि त्यांनी १४ बूथसाठी ६ लाख ६० हजार भरले आहेत. न्यायालयीन अपीलाची मुदत संपल्यानंतर म्हणजे ४५ दिवसांनंतर या पडताळणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

राहुरी मतदारसंघात माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे असलेले प्राजक्त तनपुरे यांचा भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी ३४ हजार ७४५ मतांनी पराभव केला आहे. कर्डिले यांना १ लाख ३४ हजार ८८९ तर तनपुरे यांना १ लाख १४४ मते मिळाली आहेत. पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी २ हजार ४०६ मतांनी पराभव केला आहे. दाते यांना १ लाख १२ हजार ७७५ तर लंके यांना १ लाख १० हजार ३६९ मते मिळाली. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार १० हजार ६४५ मते मिळाली आहेत. कोपरगाव मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे संदीप वर्पे यांचा महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी १ लाख २४ हजार ६२४ मतांनी पराभव केला आहे. काळे यांना १ लाख ६१ हजार १४७ तर संदीप वर्पे यांना ३६ हजार ५२३ मते मिळाली आहेत.

आता यातील तिन्ही पराभूत उमेदवारांनी इव्हीएम पडताळणीसाठी रितसर अर्ज केला आहे. याच पक्षाचे नगर शहर मतदारसंघातील पराभूत उमेदवार अभिषेक कळमकर यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. मात्र, अशी मागणी करण्याचे धोरण पक्षीय पातळीवरच ठरल्याचे सांगण्यात येते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी देशातील आठ-दहा उमेदवारांनी असे पडताळणीचे अर्ज दाखल केले होते. अहिल्यानगरमधून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांनीही अर्ज केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी न्यायालयात दाद मागितल्याने ही पडताळणी अद्याप झालेली नाही. न्यायालयातील याचिकेवरील निर्णयानंतर यासंबंधीची कार्यवाही होऊ शकते. मात्र, न्यायालयातील याचिकाही प्रलंबिध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी गैरमार्गाचा अवलंब करून निव़डणूक जिंकल्याचा आरोप करीत विखे यांनी या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *