महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ नोव्हेंबर ।। नवीन मुख्यमंत्री आणि शपथविधीचा मुहूर्त अद्याप निश्चित झाले नसले तरी, विविध पदांसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत सध्या विधान परिषद सदस्य असलेले भाजपचे नागपूर जिल्ह्यातील दोन, तर राज्यातील एकूण सहा उमेदवार निवडून आले आहेत. त्यानंतर संधी न मिळालेल्यांना आता वरच्या सभागृहात जाण्याचे वेध लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीत सहा विधान परिषद सदस्य विजयी झाल्याने आणि राज्यपाल कोट्यातील आणखी पाच जागा अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये आधीच विधान परिषद सदस्य होण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण ९ विधान परिषद आमदार, तर एक राज्यसभा खासदार होते.
परिषदेवरील कोण विधानसभेत?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विधान परिषदेचे सदस्य चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघातून तर, प्रवीण दटके मध्य नागपुरातून विजयी झाले. राज्याच्या अन्य भागांत भाजपचे गोपीचंद पडळकर, रमेश कराड तसेच शिंदे सेनेचे आमश्या पाडवी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनीही विधान परिषदेतून सभेत प्रवेश केला.
कोणाला पराभवाचा धक्का?
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आमदारांमध्ये कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादी : शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेल्या भाजपच्या राम शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय रिसोडमधून काँग्रेसचे अमित झनक यांच्याकडून पराभूत झालेल्या शिवसेनेच्या भावना गवळी, शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, भाजपच्या प्रशांत बंब यांच्याकडून पराभव झालेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या सतीश चव्हाण यांचा समावेश आहे. विधानसभेला उतरलेले एकमेव राज्यसभा खासदार मिलिंद देवरा वरळीत आदित्य ठाकरेंकडून पराभूत झाले.