Markadwadi Voting: मारकडवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान थांबवलं, उत्तम जानकरांचे प्रशासनावर आरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ डिसेंबर ।। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीमधील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. प्रशासनाच्या दबावामुळे ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी याबाबतची घोषणा केली. ‘सरकार घाबरलंय म्हणून मतदान करून दिलं नाही.’, असे मत उत्तम जानकर यांनी यावेळी व्यक्त केले.

मारकडवाडीतील गावकऱ्यांनी आज बॅलेटपेपवरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. पण पोलिस प्रशासनाने बॅलेट पेपरवर मतदान करण्यास परवानगी दिली नाही. मतदान करण्यासाठी गावकऱ्यांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केली होती पण मतदान करण्यासाठी येणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू असे पोलिसांनी सांगितले होते. पोलिस प्रशासनाकडून दबाव येत असल्यामुळे ही मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली.

उत्तम जानकर यांनी यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मारकडवाडी गाव दहशतीखाली आहे. एक मत जरी पडलं तरी कारवाई करू असे पोलिस प्रशासनाने सांगितले. त्यामुळे आम्ही ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला. ही मतदान प्रक्रिया थांबली असली तरी देखील आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊन मोर्चा काढणार आहोत. आता थांबलो तरी आंदोलन करणार आहोत. तहसीलदारांनी आदेश काढले. हे सरकार घाबरले आहे.’

मारकडवाडी गावामध्ये आतापर्यंत शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांना मताधिक्य मिळत होते. पण या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे उत्तम जानकर यांनी स्वखर्चाने गावात बॅलेटपेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. गावामध्ये मतदानासाठी ५ बूथ तयार करण्यात आले होते. आज सकाळपासून या मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. पण मतदान प्रक्रियेला पोलिसांनी परवानगी दिली नाही.

मारकडवाडी गावामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसंच जमावबंदीचे आदेश देखील जारी करण्यात आले. मतदान करण्यासाठी गावकऱ्यांनी यायला सुरूवात केली होती. पण जर एकही मतदान झालं तर कारवाई करू आणि गु्न्हे दाखल करू असे पोलिसांनी गावकऱ्यांना सांगितले. त्यामुळे दहशतीखाली आलेल्या नागरिकांनी मतदान केले नाही. या गावामध्ये प्रशासनाची दहशत होती त्यामुळे शेवटी मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय उत्तम जानकर यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *