महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ डिसेंबर ।। वेगवेगळय़ा बँकांमधील वाढत्या फ्रीज आणि निक्रिय खात्यांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केली आहे. बँकांना अशा खात्यांना कमी करण्यासाठी तातडीने आवश्यक ती सर्व पावले उचलण्याच्या सूचना आरबीआयकडून देण्यात आल्या आहेत. अशा खात्यांच्या केवायसीसाठी मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंग, नॉन-होम ब्रांच, व्हिडीओ ग्राहक ओळख यासारख्या सोप्या प्रक्रियांचा अवलंब करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे अशा खात्यांमध्ये येणारी रक्कम कोणत्याही अडचणीशिवाय जमा होत राहील याची काळजी घेण्यास सांगितले आहे. ज्या खात्यांमध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणतेही व्यवहार झालेले नाहीत त्यांना निक्रिय खाती म्हणून वर्गीकृत केले जाते. यावर आता आरबीआयने कडक पावले उचलली आहेत.
निक्रिय खात्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना आरबीआयने दिल्या आहेत. निक्रिय खात्यांतून फसवणूक होण्याचा धोका कमी करण्यासाठी आरबीआयने बँकांना सहा महिन्यांसाठी पुन्हा सक्रिय केलेल्या खात्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते. तसेच एक वर्षापासून निक्रिय असलेल्या खात्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
11 हजार कोटींची फसवणूक
2024 च्या पहिल्या नऊ महिन्यांत सायबर फसवणुकीमुळे देशाला 11,333 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. डिसेंबर 2023 पर्यंत सुमारे 20 टक्के जन धन खाती निक्रिय होती.