राज्यातील ७५५ केंद्रांवर मतपडताळणी ; १०४ अर्ज आल्याची निवडणूक आयोगाची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ डिसेंबर ।। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यापैकी अनेकांनी ‘ईव्हीएम’ आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी अर्ज केले असून, त्यात बाळासाहेब थोरात, विनोद घोसाळकर, फहाद अहमद, श्रद्धा जाधव, माणिकराव ठाकरे, संग्राम थोपटे, बाळाराम पाटील, राम शिंदे, संजय जगताप, राजेश टोपे, रोहिणी खडसे आदींचा समावेश आहे.

राज्यात ‘ईव्हीएम’वरून विरोधकांचे आरोपसत्र कायम असून, ‘ईव्हीएम’मधील मते आणि ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांच्या पडताळणीची मागणी विरोधक करीत आहेत. राज्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मायक्रो कंट्रोलरच्या तपासणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे १०४ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आयोगाने गुरुवारी दिली. राज्यातील ७५५ मतदान केंद्रांवरील ‘ईव्हीएम’मधील मते आणि ‘व्हीव्हीपॅट’च्या पावत्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेत विरोधकांनी ‘ईव्हीएम’विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. राज्यातील ३१ जिल्ह्यांतील एकूण ९५ विधानसभा मतदारसंघांत ‘ईव्हीएम- व्हीव्हीपॅट’ची ‘ब्रंट मेमरी’ आणि ‘मायक्रो कंट्रोलर’च्या तपासणीसाठी आणि पडताळणीसाठी १०४ अर्ज प्राप्त झाले आहेत. या १०४ अर्जांमधून राज्यातील १ लाख ४८६ मतदान केंद्रापैकी ७५५ मतदान केंद्रावरील ‘ईव्हीएम’ संचांच्या तपासणीची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील ५ जिल्ह्यांत म्हणजेच सिंधुदुर्ग, नंदुरबार, अमरावती, वर्धा आणि गडचिरोली येथे तपासणीसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नसल्याचे आयोगाने सांगितले.

पुण्यात सर्वाधिक अर्ज
आयोगाकडे प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. पुण्यातील एकूण ११ मतदारसंघांत १३७ ‘ईव्हीएम’ तपासणीची मागणी करण्यात आली आहे. त्यात शिरूर मतदारसंघातून अशोक पवार, हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप, पुणे कँटोन्मेंट मतदारसंघातून रमेश बागवे, भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे यांच्यासह अनेकांनी अर्ज केले आहेत.

मुंबई उपनगरात ६४ अर्ज
मुंबई उपनगरातून ६४ आणि मुंबई शहरातून चार ईव्हीएमच्या तपासणीची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यात चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांनी २० मशिनच्या तपासणीची मागणी केली असून, कुर्ला मतदारसंघातून प्रवीणा मोरजकर यांनी १० मशिनच्या तपासणीची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *