Holiday Tours : नाताळच्या सुट्टीत पर्यटकांची या ठिकाणाला पसंती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० डिसेंबर ।। दिवाळीनंतर आता आगामी हिवाळी अधिवेशन व नाताळ सुट्यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा व्याघ्र पर्यटनाला पर्यटकांनी पसंती दर्शवली असल्याचे समोर आले आहे. ताडोबा प्रकल्प आता पुन्हा एकदा प्रकल्प फुल्ल झाला आहे. दरम्यान मागील सव्वा महिन्यात प्रकल्पाच्या बफर व कोर क्षेत्रात मिळून सुमारे सुमारे ४० हजारांहून जास्त पर्यटकांनी हजेरी लावली आहे. पर्यटकांनी पुन्हा एकदा व्याघ्र पर्यटनाला पहिले स्थान दिले आहे. दिवाळीनंतर नाताळ सुट्या पार्श्वभूमीवर अनेकांनी योजना आधीच आखल्या आहेत. त्यात ताडोबा पसंतीस उतरल्याचे दिसत आहे. पर्यटकांनी यंदाही ताडोबाचेच बेत आखून सफारी करण्याचा निश्चय केला. त्यासाठी आगाऊ ऑनलाईन बुकींग देखील करून ठेवले आहे. मागील महिन्यापासून कोअर झोन मधील सर्वच सहा गेट हे फुल्ल झाले आहे. प्रकल्पात सफारीसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असून त्यामुळे ताडोबा पर्यटकांनी पुन्हा एकदा गजबजले आहे.

मंगळवारी कोर व बुधवारी बफर झोन पर्यटनासाठी बंद असतो. तो अपवाद वगळता ताडोबात यंदा सुट्टीचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. प्रकल्पात सकाळ व दुपार सफारीत पर्यटकांना व्याघ्रदर्शनही होत आहे. त्यामुळे येथे येण्याचा त्यांचा उद्देश सफल झाल्याचा विशेष आनंद झाल्याचे पर्यटकांनी नमूद केले. त्याचबरोबर इतरही वन्यप्राण्याचे दर्शन पर्यटकांना सुखावून जात आहे. मागील सव्वा महिन्यात सुमारे बफर व कोर क्षेत्रात ४० हजारांहून जास्त पर्यटकांनी सफारी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील महिनाभर देखील पर्यटकांची रेलचेल बुकिंग वरून दिसून येत असल्याची पुष्टी सूत्रांनी जोडली. ‘कोर झोन’ फुल्ल असला तरी, बफर झोन मध्ये पर्यटकांना सफारीची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व वनविभागाने इको टुरिझमला चालना दिल्याने तसेच ताडोबा व्यवस्थापनानेही पर्यटनवाढीसाठी पुढाकार घेतल्याने मागील काही वर्षात येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत.

कोअर झोनसोबतच बफर झोनमध्येही सफारीसाठी पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर कल दिसून आला आहे. आगामी नागपूर अधिवेशन कमी कालावधीचे असले तरी या काळात ताडोबात ‘व्हीआयपी’ पर्यटकांचीही रेलचेल दिसणार आहे. दरम्यान ताडोबा प्रकल्पातील सफारीसाठी आतापर्यंत सरासरी ८० टक्के बुकिंग नाताळ सुट्यांच्या कालावधीत झाले आहे.लाल चंदनाचे झाड पर्यटकांचे आकर्षण – ताडोबातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वन विभागाचे विश्रामगृह परिसरातच जुनी लाल चंदनाची ३ झाडे आहेत. ताडोबातील वाघांचे जसे पर्यटकांना आकर्षण आहे, तसे आता लाल चंदनाचे झाडही आकर्षणाचा विषय बनला आहे. ‘पुष्पा’ चित्रपटानंतर आता या झाडाला बघणाऱ्यांची संख्याही वाढली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *