महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ डिसेंबर ।। रात्रगस्तीदरम्यान कर्तव्यावर असणार्या पोलिसांना आता व्हॉट्सअॅप ग्रुपवर लोकेशन पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे; तसेच वरिष्ठ अधिकार्यांनादेखील वॉकी-टॉकीवर स्वतः कॉल द्यावा लागणार आहे. नियंत्रण कक्षाने रात्रभरात चारवेळा वरिष्ठ अधिकार्यांचे लोकेशन घ्यायचे आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाकडून काढलेल्या या आदेशामुळे कामचुकार पोलिसांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे.
मागील काही वर्षांपासून पोलिस दलात व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यामुळे बहुतांश कामे सोपी तसेच जलद झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने गस्तीवर वॉच ठेवण्याचे महत्त्वाचे काम व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होत आहे.
दरम्यान, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नुकतेच अंमलदार आणि पोलिस अधिकारी यांच्या लोकेशनबाबत एक आदेश जारी केला आहे. यामध्ये रात्रगस्तीदरम्यान पोलिसांचे लोकेशन तपासणीबाबत सूचित करण्यात आले आहे. आयुक्तालय हद्दीत, रात्रगस्त प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस उपायुक्त तर सहाय्यक प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त तसेच परिमंडळीय स्तरावर प्रभारी अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवाना होताना त्यांनी पोलिस ठाणे, घटनास्थळ भेट आणि रात्रगस्त संपल्यानंतर नियंत्रण कक्षास स्वतः कॉल द्यायचा आहे.
नियंत्रण कक्षातील प्रभारी अधिकार्याने रात्रगस्त कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी यांचे चार वेळा लोकेशन घ्यायचे आहे. नियंत्रण कक्षाकडून लोकेशन घेत असताना संबंधित पोलिस अधिकारी यांनी स्वतः उत्तर द्यायचे आहे. याव्यतिरिक्त नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी यांनी पोलिस ठाण्यातील अधिकारी/बीट मार्शल यांचे दर दोन तासाला लोकेशन घ्यावे लागणार आहे. संबंधित अधिकारी आणि बीट मार्शल हेदेखील स्वतः कॉलला उत्तर देतील, असे पोलिस आयुक्त चौबे यांनी काढलेल्या आदेशात नमूद असल्याने अनेकांची अडचण झाली आहे.
परस्पर बदल नको
यापूर्वी रात्रगस्त तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कर्तव्य बजावण्यात येत नव्हते. रात्रगस्तीदरम्यान काहीतरी कारणे समोर करून बदल केले जात होते; मात्र यापुढे आता पोलिस उपायुक्त/सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांनी पोलिस आयुक्तांच्या आणि परिमंडळीय व विभागीय रात्रगस्त प्रभारी पोलिस निरीक्षक यांनी अपर पोलिस आयुक्त यांच्या पूर्वपरवानगीशिवाय रात्रगस्तीत बदल करू नयेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
खोटे लोकेशन येईल अंगलट
नियंत्रण कक्षाकडून आलेल्या कॉलला काहीजण चुकीचे लोकेशन देत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान, सप्टेंबर 2024 मध्ये एका कर्मचार्यास खोटे लोकेशन दिल्याप्रकरणी तडकाफडकी निलंबितदेखील करण्यात आले आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षाला खोटे लोकेशन देणे पोलिसांच्या अंगलट येणार आहे.