महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ डिसेंबर ।। पाच महिने सिमेंटच्या किमती स्थिर राहिल्यानंतर डिसेंबरमध्ये सिमेंटच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. पावसाळा त्यानंतर आलेले सण यामध्ये मजुरांची उपलब्धता वाढल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात सिमेंटची मागणी वाढली आहे. तसेच मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्येही सिमेंटची मागणी कायम असल्याने या महिन्यात सिमेंटच्या किमतीत वाढ झाली. सिमेंट उद्योगातील बड्या कंपन्यांचे अधिग्रहण होऊन काही मोजक्याच कंपन्या शिल्लक राहिल्याने किमती वाढत राहतील, असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
पश्चिम भारतात 50 किलो सिमेंटच्या पोत्याच्या किमतींमध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ झाली असून, सध्याच्या किमती 350 ते 400 रुपयांदरम्यान आहेत. उत्तर भारतात दिल्लीसह अनेक भागांमध्ये पोत्यामागे 20 रुपयांनी वाढ झाली असून, किमती 340 ते 395 रुपयांदरम्यान आहेत. दक्षिण भारतात सिमेंटची मागणी नेहमीच कमी असते. त्यामुळे किमती कमी असतात. पण, तिथेही पोत्यामागे 40 रुपयांपर्यंत किंमत वाढली आहे. सध्या दक्षिण भारतात दर प्रति बॅग 320 रुपयांवर पोहोचले आहेत. पूर्व भारतातही काही महिने दर स्थिर राहिल्यानंतर सिमेंट बॅगची किंमत 30 रुपयांनी वाढली आहे. इनक्रेड इक्विटीजच्या अहवालातील अंदाजानुसार, डिसेंबर महिन्यात सरासरी भागांमध्ये सिमेंटच्या किमती प्रति बॅग 10-15 रुपयांनी वाढतील, या अहवालात म्हटले आहे की, 2025 आर्थिक वर्षाच्या दुसर्या टप्प्यात सरकारचा भांडवली खर्च अजून वाढणार आहे, त्यामुळे सिमेंटच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण वाढीव उत्पादन क्षमतेमुळे मोठ्या प्रमाणावर दरवाढ नको, अशी मागणी आताच उद्योगातून सुरू झाली आहे.