महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ डिसेंबर ।। भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एका कार्यक्रमात दिसून आले होते. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ व्हायरल होताच त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली गेली होती.
त्यानंतर भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी विनोद कांबळी यांना ऑफर दिली होती. आता ही ऑफर कांबळींनी मान्य केली आहे.
मुलाखतीत केला खुलासा
विनोद कांबळी यांनी विकी लालवानी यांच्या युट्यूब चॅनलवर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कपिल देव यांनी दिलेली ऑफर मान्य केली आहे.
या मुलाखतीत बोलताना विनोद कांबळी म्हणाले, ‘ मी रिहॅबसाठी जायला तयार आहे. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. मला कुठल्याच गोष्टीची भिती नाहीये, त्यामुळे मला रिहॅबसाठी जायचंय. ‘ विनोद कांबळी रिहॅबसाठी जाणार असल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही १४ वेळेस ते रिहॅबसाठी गेले असल्याचं त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं.
या मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांना युरीन इन्फेक्शन झालं आहे. त्यामुळे ते बेहोशही झाले होत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. कांबळींनी सांगितल्याप्रमाणे त्यांची पत्नी आणि मुलं त्यांची काळजी घेत आहेत.
विनोद कांबळी आर्थिक परिस्थितीही खूप खराब आहे. बीसीसीआय दरमहा त्यांना ३० हजार रुपये पेन्शन स्वरुपात देते, हा त्यांचा एकमेव इन्कम सोर्स आहे.
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात एकत्रच केली होती. २००९ मध्ये विनोद कांबळींनी सचिन तेंडुलकरवर आरोप केले होते. त्यांनी आरोप करत म्हटले होते की, लहानपणीचा मित्र असूनही सचिनने कुठलीही मदत केली नाही.
या आरोपांनंतर दोघांचं एकमेकांशी बोलणं बंद झालं होतं. त्यानंतर २०१३ मध्ये जेव्हा सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं, त्यावेळी सचिनने विनोद कांबळींचा उल्लेखही केला नव्हता. आता मुंबईतील कार्यक्रमात सचिन स्वत: उठून विनोद कांबळींना भेटण्यासाठी गेला होता.
सचिनबाबत खुलासा करताना ते म्हणाले की, त्यावेळी मी खूप निराश होतो. त्यामुळे मी सचिनबद्दल असं म्हणालो होतो. मला वाटलं होतं की, सचिनकडून मला हवी तितकी मदत मिळालेली नाही. मात्र त्याने २०१३ मध्ये त्याने २ शस्त्रक्रिया करण्यासाठी मला मदत केली होती.’