महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ डिसेंबर ।। Municipal Corporation Election : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण पुढील तीन महिने महापालिका निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट झालेय. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून माहिती मिळाली आहे. महापालिका निवडणुका घेण्यासाठी तीन महिन्याचा वेळ लागणार आहे, त्यामुळे तुर्तास कोणत्याही महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही.
मागील दोन ते तीन वर्षांपासून राज्यातील महापालिका निवडणुका झालेल्या नाहीत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाण्यासह राज्यातील २५ पेक्षा जास्त महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आता तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो. आयोगाची निवडणुकीची तयारी पूर्ण झाल्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आयोगाकडून याची तयारी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
एप्रिल महिन्यानंतरच निवडणुका होणार –
पुणे, नाशिक, मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील महापालिकेच्या निवडणुका तूर्तास होण्याची शक्यता नाही. निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तयारीसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारी रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची जोरदार चर्चा सुरू आहे. पण आता एप्रिल महिन्यानंतरच राज्यातील निवडणुका होण्याची शक्यता आहे.
राज्यातील महापालिका निवडणुका एप्रिल २०२५ नंतरच होण्याची शक्यता आहे.कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकलानंतर तयारीसाठी किमान तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. २२ जानेवारी २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे. प्रामुख्याने महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी, प्रभाग रचना कशी असावी आणि प्रभाग रचना, सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने, याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा वेळ लागेल. त्यामुळे तूर्तास महानगरपालिकांसह नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही.