महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ डिसेंबर ।। टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्याला उद्या म्हणजेच १४ डिसेंबरला सुरूवात होणार आहे. ब्रिस्बेन येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीमध्ये विजय मिळत मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. दुसऱ्या सामन्यात कमबॅक करणारा ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियासाठी फलंदाजी चिंतेचा विषय असून दुसऱ्या सामन्यात सगळेच ढेपाळलेले दिसले होते. अशातच तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाने एक बदल केलेला पाहायला मिळाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये त्यांचा हुकमी एक्का असलेला जोस हेजलवुड याने कमबॅक केले आहे. त्यामुळे स्कॉट बोलंड याला बाहेर बसावं लागलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये बोलंड याने पाच विकेट घेत कमिन्सला साथ दिली होती. विराट कोहली, शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराज यांना त्याने आऊट करत महत्त्वाच्या विकेट घेतल्या होत्या. पहिल्या सामन्यामध्ये पाच विकेट घेणारा हेजलवुड दुखापतीमुळे दुसऱ्या पिंक बॉल कसोटीमध्ये खेळू शकला नव्हता. मात्र आता गाबावर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीमध्ये हेजलवूड हा मैदानात उतरताना दिसणार आहे.
जोस हेडलवुड याने त्याचा जोडीदार मिचेल स्टार्कसोबत नेटमध्ये ४५ मिनिटे गोलंदाजीचा सराव केला. सराव सत्रामध्ये दोघांनी जोस इंग्लिस आणि क्वीन्सलँड यांना गोलंदाजी केली. यावेळी बॉलिंग कोच डॅन व्हिटोरीसुद्धा होते. ऑस्ट्रेलिया आपल्या तगड्या गोलंदाजासंसह मैदानात उतरताना दिसणार आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.