![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ डिसेंबर ।। उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने यंदाच्या हंगामात सपाट भूभागावर तापमान प्रथमच शून्य अंशाच्या खाली घसरला आहे. महाराष्ट्रातही गारठा कायम असून धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यात नीचांकी ६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
लक्षद्वीप आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रात आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार असून, सोमवारपर्यंत या भागात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. यातच पश्चिमी चक्रावात आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे. शनिवारी पंजाबच्या ‘अदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी उणे ०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मध्य, पश्चिम (महाराष्ट्रसह) आणि पूर्व भारतात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकण्याची व हळूहळू कमजोर होण्याची शक्यता आहे. 14 डिसेंबरपासून वाऱ्याच्या स्वरूपात बदल होण्यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांचा अडथळा येण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पातून ओलाव्याचा शिरकाव होऊ शकतो. पुन्हा, 15 डिसेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील एका आठवड्यासाठी रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
