महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ डिसेंबर ।। दोन दिवसांपासून महाराष्ट्र थंडीने कुडकुडला आहे. हाडं गोठवणारी थंडी पडत आहे. त्यामुळे राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे, पुढील चार दिवस थंडी टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यातील थंडीने तर मागील सहा वर्षांतील सर्व विक्रम मोडले आहेत. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात कडाक्याची थंडी पडत आहे.
दोन दिवस थंडीची लाट –
मागील दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे ५ वाजताचे किमान तापमान बऱ्याच ठिकाणी एक अंकी संख्येवर आले. तापमाने सरासरीपेक्षा २ ते ६ डिग्रीपर्यंत घसरले. जळगाव अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बुलढाणा, धाराशिव, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा ह्या सर्व जिल्ह्यात ह्या दोन दिवसात थंडीची लाट व काही जिल्ह्यात थंडीची लाटसदृश्य स्थितीची शक्यता जाणवते.
महाराष्ट्र शिमल्यासारखा गारठला
सध्या जाणवत असलेली अपेक्षित थंडी बुधवार दि. १८ डिसेंबर(संकष्टी चतुर्थी)पर्यंत टिकून राहण्याची शक्यता ही कायम आहे. खान्देशातील नंदुरबार धुळे जळगांव अश्या तीन जिल्ह्यात काही ठिकाणी सरासरी असलेल्या साधारण दवांक बिंदू तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमुळे अति खालावलेल्या किमान तापमानातून, भू-स्फटिकीकरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शिमल्यासारखी थंडी पडली आहे.
धुळे ४ अंशावर, जम्मू काश्मीरपेक्षा कमी तापमान –
धुळ्यात तापमानाचा पारा सलग दुसऱ्या दिवशी देखील 4 अंशावर स्थिरावला आहे. जम्मू काश्मीरपेक्षाही कमी थंडी महाराष्ट्रात जाणवत आहे. काल देखील धुळ्यात चार अंश डिग्री सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून धुळ्यात सातत्याने तापमानात घट होत आहे. वाढत्या थंडीचा धुळेकरांना करावा लागत आहे सामना.
पुण्याने सर्व विक्रम मोडले –
थंडीने पुणे शहर कुडकुडले असून, दिवसाही गारवा जाणवत आहे. सहा वर्षांतील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद सोमवारी झाली. शहरातील काही भागात ६.१ तर काही भागात ६.२ इतके नीचांकी तापमानाची नोंद झाली. शहरात सध्या गारठा जाणवत असून, दिवसाही स्वेटर घालावा लागत आहे. रात्री तापमानाचा पारा कमालीचा घसरला असून, रविवारी रात्री थंडीत वाढ झाली. २०१८ पासून पहिल्यांदाच तापमानाचा पारा सहा पर्यंत घसरला आहे. २०१८ मध्ये ५.९ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. त्या आधी २०१३ आणि २०१५ मध्ये सहा अंशाजवळ तापमानाचा पारा पोहोचला होता.
वर्षनिहाय नोंदवलेले नीचांकी तापमान
वर्ष – तापमान (सेल्सिअस अंश से.)
२०१३ – ६.८
२०१४ – ७.८
२०१५ – ६.६
२०१६ – ८.३
२०१७ – ८.७
२०१८ – ५.९
२०१९ – १३.७
२०२० – ८.१
२०२१ – ११.२
२०२२ – ८.९
२०२३ – ११.३
परभणीचे तापमान 5डिग्री सेल्शियसची नोंद.
गेल्या तीन दिवसापासून परभणीत तापमाणात मोठी घट होत असून काल 4.1तापमानाची नोंद झाली होती आज त्यात किंचित वाढ होत 5.अंश सेल्शियस नोंद झालीय,.पुढील एकदोन दिवस असच तापमान राहण्याचा अंदाज आहे..रब्बीतील ज्वारी, गहू हरबरा पिकांना ह्या थंडीचा फायदा होणार असून .यंदाच्या मौसमातल हे सर्वात निचांकी तापमान असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याच आव्हान हवामान विभागाने केले आहे.
लातूर जिल्हा गारठला, शेकोट्या पेटल्या
मागच्या काही दिवसापासून लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही तापमानाचा पारा घसरला आहे.. निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी या परिसरात 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.. सध्या ग्रामीण भागात थंडीची लाट वाढल्याने वयोवृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटी पेटवून आधार घेत आहेत. तर पुढील काही दिवस अशा प्रकारचीच थंडीची लाट राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलीय.
बदलापुरात यंदाच्या मोसमातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद
उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात गारठा वाढलाय. बदलापुरात आज पहाटे 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी पारा 10 अंशावर घसरला होता. मुंबईत 14 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. वर्षाच्या सुरुवातीला 23 जानेवारी रोजी मुंबईचं तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं होतं. वर्षाखेरीस डिसेंबर महिन्यातच थंडीचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय. पुढील तीन ते चार दिवस थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगरचा पारा ८ अंशावर
राज्यात तापमानाचा पारा खाली आला असून थंडी वाढली आहे. अहिल्यानगर शहरांमध्ये आज आठ सेल्सिअस अंश किमान तापमान तापमानाची नोंद करण्यात आली. तर रविवारी नीचांकी तापमान म्हणजेच 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. थंडीमुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. शाळेतील मुलांना देखील भरपूर उबदार कपडे घालून शाळेत पाठवले जात आहे. मैदानावर व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये वयोवृद्ध नागरिक पाहायला मिळत नाहीत , बाहेर पडलेले नागरिक चहाच्या ठेल्यावर चहा गरम चहा घेऊन थंडीवर मात करताना पाहायला मिळताहेत.