नव्या वर्षात महाविद्यालयांना 25 शासकीय सुट्या!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ डिसेंबर ।। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांना नवीन वर्षात अर्थात 2025 मध्ये 25 शासकीय सुट्या मिळणार आहेत. रविवारच्या साप्ताहिक सुट्टीचा दिवस वगळता या सुट्या असून, यातील प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा, रामनवमी, मोहरमच्या सुट्या रविवारी आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षातील सुट्यांचे नियोजन करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना शनिवारी आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळत असते. परंतु, त्याचबरोबर काही सार्वजनिक आणि शासकीय सुट्या देखील असतात. सुट्टीच्या दिवशी संबंधित कार्यालयाचे किंवा महाविद्यालयाचे कामकाज बंद असते.

विद्यापीठाच्या कार्यालयाला रविवारबरोबरच महिन्याच्या पहिल्या आणि तिसर्‍या शनिवारी सुट्टी असते. त्यामुळे त्या दिवशी विद्यापीठाचे कामकाज बंद राहणार आहे. याव्यतिरिक्त महाविद्यालयांना उन्हाळी सुट्यांबरोबरच दिवाळीदरम्यानही सुट्या असतात. त्यामुळे पुढील वर्षी सर्वाधिक सुट्यांचा आनंद घेता येणार आहे. विद्यापीठाने वर्ष 2025 मधील शासकीय सुट्यांचे परिपत्रक जाहीर केले आहे.

नऊ सुट्या जोडून आल्यामुळे ‘दीर्घ सुटी’चे नियोजन

साप्ताहिक रविवारच्या सुटीला जोडूनच सोमवार, शनिवार किंवा शुक्रवारी सुटी आल्यास ‘दीर्घ सुटी’चे नियोजन केले जाते. यंदा तब्बल नऊ सुट्या अशा येणार असल्याने विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांना फायदा होणार आहे. या नऊपैकी तीन सोमवारी, एक शनिवारी आणि पाच शुक्रवारी आल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाला संबंधित जिल्हाधिकार्‍यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या सुट्या लागू होतील. तसेच, महाविद्यालय किंवा संस्थेला जाहीर सुट्यांपैकी काही सुट्या देता येणे शक्य नसल्यास त्याबदल्यात सोयीनुसार पर्यायी सुटी देता येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *